नेरळ : माथेरान घाटात गुरुवारी जुने झाड कोसळून दोन तास वाहतूक ठप्प झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी पुन्हा सायंकाळी ५ च्या सुमारास नेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली आहे. परिणामी, वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. घाटात दरड कोसळण्याच्या घटना सुरूच असून प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पर्यटक आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानला फटका बसत आहे. जमीन दलदल होऊन झाड कोळण्याच्या तर दरड कोसळण्याची घटना घडत असल्याने घाटात वाहतूककोंडी निर्माण होत आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही दरड कोसळली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून, दगड बाजूला करण्याचे काम आपत्ती व्यवस्थापनाकडून सुरू आहे.
दरवर्षी नेरळ-माथेरान घाट रस्त्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे घाट रस्त्याला संरक्षक जाळी बसविण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत आहे, तसेच यावर्षी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनीही मंत्र्यांना भेटून संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्यात, अशी मागणी केली होती; परंतु अद्याप या घाट रस्त्यावर कोणतीही उपाययोजना न केल्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत आणि परिणामी, माथेरानचे नागरिक, पर्यटक आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने वेळीच लक्ष देऊन माथेरान या पर्यटनस्थळी घाट रस्त्याला संरक्षक जाळ्या बसवाव्यात आणि अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे.