अलिबाग : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २४ डिसेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील मोहोपाडा, खालापूर तालुक्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ सेक्युरिटी मार्केट (एनआयएसएम) या संस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम नियोजनबद्ध व शांततेच्या वातावरणात होण्याच्या दृष्टीने रायगड जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी रायगड जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात (नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र वगळून) २३ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ पासून ते २४ डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४ (१) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. यानुसार जिल्ह्यात प्रतिबंध करण्यात आलेल्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत.पंतप्रधान यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ज्या महत्त्वाच्या व्यक्ती, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र पारित करण्यात आले आहे. अशा व्यक्तींच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही व्यक्तीकार्यक्रम ठिकाणाच्या परिसरात असलेल्या रस्त्यावर, हमरस्त्यावर व गल्लीबोळात, सार्वजनिक जागेत जमाव वा प्रवेश करणार नाही. कार्यक्रमाच्या कामासाठी नेमणूक केलेले अतिमहत्त्वाच्या व्यक्ती व विविध विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त मोबाइल फोन किंवा कॅमेरा कार्यक्रम ठिकाणी घेऊन जाणार नाही किंवा कार्यक्रमाच्या आतील भागात पी.सी.ओ. चालू ठेवणार नाही. कोणीही व्यक्ती शस्त्र, क्षेपक, काड्यांची पेटी, लायटर आदी कोणतीही आक्षेपार्ह वस्तू, वॉकीटॉकी, कॉडलेस टेलिफोन, ज्वलनशील पदार्थ घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणाच्या परिसरात प्रवेश करणार नाही. रायगड जिल्ह्याच्या पोलीस कार्यक्षेत्रामध्ये खासगी हेलिकॉप्टर उतरविणे व उड्डाण करणे, मायक्रोलाइट, एअरक्राप्ट, हँग ग्लायडर, ड्रोण, पॅराग्लॅडिंग, बलून, पॅराशुट, हवेत उडणाऱ्या व रिमोटद्वारा संचलित होणाऱ्या वस्तू व खेळणी आदींचे उड्डाण करण्यास बंदी आहे. (विशेष प्रतिनिधी)
नरेंद्र मोदी आज रायगडमध्ये
By admin | Published: December 24, 2016 3:20 AM