नेरळ येथे आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल; ठेकेदार अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 01:01 AM2019-03-28T01:01:59+5:302019-03-28T01:05:01+5:30
मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील अंतर्गत रस्त्यांसाठी व ओपन जिम, सभामंडप यासाठी एकूण १५ लाखांचा निधी रायगड जिल्हा परिषदेकडे वर्ग केला होता.
नेरळ : मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील अंतर्गत रस्त्यांसाठी व ओपन जिम, सभामंडप यासाठी एकूण १५ लाखांचा निधी रायगड जिल्हा परिषदेकडे वर्ग केला होता. त्यापैकी नेरळच्या अंतर्गत रस्त्यांची कामे आता पूर्ण झाल्याने त्या ठिकाणी खासदारांनी कामाचे उद्घाटन केल्याच्या पाट्या लागल्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला. ही बाब लक्षात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या विरोधात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्या अनुषंगाने नेरळ पोलीसठाण्यात संबंधित ठेकेदाराविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा नेरळ पोलीसठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
नेरळ गावातील हेटकरआळी भागातील रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण पेमारे यांच्या घरापासून फराट यांच्या घरापर्यंत, हेमंत क्षीरसागर यांच्या घरापासून तुषार रासम यांच्या घरापर्यंत असा दोन टप्प्यात आणि नितीन कांदळगावकर यांच्या घरापासून देशमुख यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण अशा तीन टप्प्यात अंतर्गत रस्त्याचे काम करण्यात आले आहे.
या रस्त्याचे काम आता पूर्णत्वास आल्याने या ठिकाणी विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या नावासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी यांच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या. मात्र, आदर्श आचारसंहिता सुरू असताना अशा उमेदवाराच्या नावाच्या पाट्या लावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेरळ शहराध्यक्ष निकेश म्हसे व युवक संघटनेने या विरोधात आचारसंहितेचा भंग झाल्याच्या तक्रारी उपविभागीय अधिकारी कर्जत व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केल्या. ही बाब नेरळ ग्रामपंचायत हद्दीत असल्याने वरिष्ठांकडून सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना कळविण्यात आले. नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राजेंद्र गुड्डे यांनी पाहणी केली असता त्यांना तक्रारीत तथ्य आढळून आले. वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी तत्काळ नेरळ पोलीसठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली.
नेरळ पोलिसांनी आचारसंहितेचे उल्लंघन करून महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रूपीकरण प्रतिबंधक अधिनियम १९९५ मधील कलम ३ चे उल्लंघन केले म्हणून ठेकेदार दीपक जाधव (रा. जिते) यांच्यावर गुन्हा दाखल के ला आहे. याबाबत अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. डी. भोईर हे करीत आहेत.