नारवेल बेनवले खारभूमी योजनेला अखेर मुहूर्त मिळाला, ५२ कोटी खर्चाची योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 01:10 AM2020-12-10T01:10:49+5:302020-12-10T01:12:07+5:30

Narvel Benavale Kharbhumi :

The Narvel Benavale Kharbhumi scheme finally got its moment | नारवेल बेनवले खारभूमी योजनेला अखेर मुहूर्त मिळाला, ५२ कोटी खर्चाची योजना

नारवेल बेनवले खारभूमी योजनेला अखेर मुहूर्त मिळाला, ५२ कोटी खर्चाची योजना

Next

- दत्ता म्हात्रे

पेण : राष्ट्रीय चक्रीवादळ आपत्ती निवारण प्रकल्पाअंतर्गत पेण तालुक्यातील ३० खारभूमी योजनांपैकी सर्वांत मोठी नारवेल बेनवले खारभूमी योजनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. अरबी समुद्राला मिळणाऱ्या काळेश्री तसेच धरमतर खाडीकिनारी असलेल्या तब्बल १३८८ हेक्टर शेतजमिनीला या योजनेतील संरक्षक बंधाऱ्याचे बळकटीकरण, मातीकामावर दोन बाजूंना दगडी पिचिंग बंधाऱ्याच्या माथ्यावर दगडमातीचा मुरुम याप्रमाणे या संरक्षक बंधाऱ्याचे १६.४० किमी लांबीचे काम सुरू झाले आहे.

वासखांडीपर्यंतच्या काळेश्री बोर्झे, वढाव, दिव, वाशी या पाच ग्रामपंचायतींमधील ६ महसुली गावे १३ वाड्यांमधील शेतकरी, सामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण व शेती संरक्षणाची मोठी योजना असे या योजनेचे महत्त्व आहे. ५२ कोटी प्रशासकीय खर्चासाठी मंजुरी मिळाली असून ७५ टक्के केंद्र सरकारचा निधी तर २५ टक्के राज्य सरकारचा निधी असे या योजनेचे स्वरूप आहे. चक्रीवादळ व समुद्राला येणाऱ्या उधाण भरतीमुळे खाडीकिनारी असलेल्या शेतघरे, वाड्यावरची लोकवस्ती व नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण व होणारे नुकसान टाळण्यासाठी ही योजना आघाडी सरकार असताना प्रस्तावित करण्यात आली. तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रीय चक्रीवादळ आपत्ती निवारण प्रकल्पाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सात योजनांचा यात समावेश होता. त्यापैकी अलिबाग तालुक्यातील चिपली काचेली खारभूमी योजना व पेणमधील नारवेल बेनवले खारभूमी योजनेला ६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. २०१४ साली सत्तांतर झाले आणि भाजप-शिवसेना सरकार आले तेंव्हा खारभूमी मंत्री दिवाकर रावते यांनीही शेतकरी बांधवासांठी या योजनेचे महत्त्व जाणून प्रयत्न केले होते. २०१५-२०१६ या वर्षात पाठवलेल्या प्रस्तावाला अखेर जुलै २०२० वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात चालना मिळून ही योजना मार्गी लागली आहे.

 खारभूमी सबडिव्हिजन पेण कार्यालयाच्या कार्यकारी अभियंते दाभीरे, उप अभियंत्या सोनल गायकवाड व साहाय्यक अभियंते दादासाहेब सोनटक्के यांच्या देखरेखीखाली व क्वालिटी कंट्रोल बोर्डाच्या अधिकारी वर्गाने परीक्षण करून योजनेचे काम पूर्ण करावयाचे आहे. या योजनेचे महत्त्व म्हणजे ही योजना शेतकरी बांधवांसाठी मैलाचा दगड ठरेल. या योजनेचा जेथून प्रारंभ होतो त्या काळेश्री बंदर व विठ्ठल वाडी येथून समुद्र मार्गे जलवाहतूक सुरू करण्यासाठी या संरक्षक बंधाऱ्याचा रस्ता वाहतुकीसाठी उपयोग होईल. 

८ उघाडीचे नूतनीकरण करण्यासाठी निधीची तरतूद
पेणच्या नारवेल बेनवले खारभूमी योजनेसाठी ५१ कोटी ७६ लाख २२ हजार ४१० रुपयांची मंजुरी मिळाली आहे. यामध्ये संरक्षक बंधाऱ्याची उंची ५.६२ मीटर तर, रुंदी ३ मीटर आहे. माथ्यावर दगडी मुरुमाचा थर, मातीच्या बांधाला दोन्ही बाजूंना दगडांची भक्कम पिचिंग असे चार चाकी वाहन जाईल याप्रमाणे बांधकामांचे स्वरूप राहणार आहे. 
विकास निधीतून ८ उघाडीचे नूतनीकरण करण्यासाठी ७ कोटी ४७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेतील मालवाहतूक करण्यासाठी अप्रोच रोड जोडण्यासाठी ८ लाख ४७ हजार रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. ३० जुलै २०२० रोजी या योजनेचा कार्यारंभ आदेश देण्यात येऊन दीड वर्षात योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदार कंपनीला काम मे, २०२२ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे.

Web Title: The Narvel Benavale Kharbhumi scheme finally got its moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड