आरडीसी बँकेला राष्ट्रीय पुरस्कार; गोवा येथे बँको संस्थेने दिला सर्वाेत्तम बँकेचा किताब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 11:49 PM2020-02-05T23:49:45+5:302020-02-05T23:50:08+5:30
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (आरडीसी) राष्ट्रीय स्तरावरील सन २०१९-२० चा सर्वाेत्तम बँक म्हणून बँको या संस्थेने सन्मानित केले.
अलिबाग : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (आरडीसी) राष्ट्रीय स्तरावरील सन २०१९-२० चा सर्वाेत्तम बँक म्हणून बँको या संस्थेने सन्मानित केले. गोवा येथे संपन्न झालेल्या समारंभात रिर्झव्ह बँकेचे माजी वरिष्ठ व्यवस्थापक शरद भागवत यांच्या हस्ते आरडीसीसी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी हा पुरस्कार स्वीकारला. आरडीसीसी बँकेने सलग तिसऱ्या वर्षी या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.
बँको या देशपातळीवरील नामांकित संस्थेकडून सहकारी बँकांचे मूल्यमापन करून उल्लेखनीय कामगिरी करणाºया बँकांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. यामध्ये बँकेचा व्यवसाय, प्रतिसेवक उत्पादकता, संगणकीकरण, आॅडिट वर्ग, कर्जवसुली, वार्षिक व्यवसाय वृद्धी, उत्तम व्यवस्थापन आणि प्रशासन या निकषांच्या आधारे पुरस्कार दिले जातात. दोन हजार ते चार हजार कोटी रुपयांचा व्यवसाय असणाºया विभागामध्ये मूल्यमापन करून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला देशपातळीवरील राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. मागील दोन वर्षे हा पुरस्कार रायगड जिल्हा सहकारी बँकेने पटकाविलेला आहे. सलग तिसºया वर्षी बँकेने हा बहुमान मिळवला आहे.
देशपातळीवर बँकिंगमध्ये डिजिटलायजेशनचे प्रमाण वाढत असताना रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यामध्ये योगदान म्हणून जिल्ह्यामध्ये विविध शाखांमध्ये एटीएमची उभारणी करून बँकेच्या ग्राहकांना एटीएम, ई-कॉमर्ससेवा, आरटीजीएस, इनईएफटी, आयएमपीएस, केसीसी कार्डचे वाटप करून तसेच समाजोपयोगी काम म्हणून प्रत्येक शाखेमार्फत एक गाव दत्तक घेऊन कॅशलेस बँकिंगचा प्रचार करण्याचे काम हातात घेतले आहे. मागील काही वर्षात रायगड जिल्हा सहकारी बँकेने राज्य तसेच देश पातळीवरील अनेक पुरस्कार पटकावले आहेत. सरकारी पातळीवरील सहकार क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. बँकेने मार्च २०१९ मध्ये तीन हजार ५०० कोटी रुपयांचा व्यावसायिक टप्पा ओलांडला आहे.
बँकेला मिळणारे पुरस्कार हे बँकेने आपल्या कार्यपद्धतीमध्ये आणलेली आधुनिकता तसेच बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि सर्व संचालक मंडळ यांचे बहुमूल्य मार्गदर्शन आणि बँकेमधील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य, सर्वोत्तम ग्राहकसेवा या सर्वांचा एकित्रत परिणाम असल्याचे प्रदीप नाईक यांनी नमूद केले. याप्रसंगी बँको या संस्थेचे अशोक नाईक बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयातील वरिष्ठ व्यवस्थापक नीलेश कदम, व्यवस्थापक प्रशांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होेते.