मोहोपाडा : मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यावर दांडफाटा ते खालापूर दरम्यान अनेक ठिकाणी रस्ता धोकादायक बनला आहे, त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
जुना मुंबई-पुणे महामार्गाची देखभाल दुरुस्ती आयआरबीकडे आहे. त्या बदल्यात शेडुंग येथे टोल वसुली नाका आहे. या महामार्गावर दांडफाटा ते खालापूर दरम्यान अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत, साइडपट्टी नसल्याने अनेकदा वाहने मार्गावरून खाली उतरतात. काही ठिकाणी रस्ता अरुंद असून पावसाळी नाले आणि रस्त्यात अंतर नसल्याने वाहने नाल्यात घसरतात. याबाबत संबंधित विभागाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
विणेगाव हद्दीत वॉटर पार्क येथे मुंबईकडे व पुण्याकडे जाताना रस्त्याच्या मधोमध मोरी आहे. मोरीच्याच एका भागाला कठडा नसल्याने दुचाकीचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयआरबीच्या ठेकेदार कंपनीची मुदत आॅगस्टमध्ये संपणार आहे, तत्पूर्वी महामार्गाच्या दुरुस्तीची कामे करावीत, अशी मागणी केली जात आहे.