नेरळ : नैसर्गिक वनसंपदेने नटलेल्या सदाहरित जंगल परिसरातील पेण-खोपोली राज्य महामार्गाचे आता राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले आहे. ३० किलोमीटर लांबीच्या अंतरावर महामार्गावर दोन बाजूना दुतर्फा असलेल्या जुनाट वटवृक्षांची अभेद्य तटबंदी आणि इतर अनेक प्रकारच्या वृक्षांची विपुलता येथे होती. यामुळे महामार्गावर शीतल हवेच्या झोतासह सावलीत प्रवास करताना प्रत्येक वाहनचालक व प्रवाशांना आल्हाददायक वातावरणाची अनुभूती मिळत असे. मात्र, आता या महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे दोन्ही बाजूंना उभी असलेली वृक्षांच्या साखळीवर कुऱ्हाडीचे घाव घालून सर्रास वृक्षतोड सुरू झाली आहे. यामुळे वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
पेण, खालापूर, खोपोली ते अलिबाग तालुक्याचा मुंबई महानगर विकास प्राधिकरणात समावेश करण्यात आल्याने भविष्यातील येथील राहणीमान व औद्योगिक विकासाला पूरक अशा सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाचे धोरण आहे. असे असले तरीही वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार जी जैवसाखळी उद्ध्वस्त होते, ती पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी कित्येक वर्षे लागतात.
केंद्र व राज्य शासनाच्या विकास धोरणानुसार पेण महामार्ग रुंदीकरणाच्या कामांमुळे भविष्यात गतिमान अशी दळणवळण व्यवस्था तयार व्हावी यासाठी रस्ते, महामार्ग रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून जी वृक्षतोड सुरू झाली आहे ती रीतसर परवानग्या घेऊन केली जात आहे. मात्र, जी झाडे तोडली जातात त्यांच्या तिपटीने वृक्षलागवड करणे बंधनकारक असते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात अशीच वृक्षतोड करण्यात आली होती. ते काम आता पेण-खोपोली महामार्गावर सुरू झाले आहे. यामुळे निसर्गसंपदेने नटलेल्या या महामार्गावरच्या सुरू झालेल्या वृक्षतोडीमुळे शीतल सावली मात्र हरवली जाणार असल्याने यामुळे पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.