पनवेल : पनवेलमध्ये राष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धेला शुक्रवारी पळस्पे उड्डाणपूल येथून सकाळी ६ वाजता सुरुवात झाली. कोरोनामुळे या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा टाळून साध्या पद्धतीने या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. २० वर्षांनंतर प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा पनवेलसह संपूर्ण मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली.आज पाच गटांत ही स्पर्धा पार पडली. यामध्ये १४ वयोगट, १६ वयोगट, १८ वयोगटासह महिला व पुरुष, अशा पाच गटांनी १० कि.मी., २० कि.मी. ते ४० कि.मी.पर्यंत स्पर्धकांनी सायकल चालविली. प्रत्येक गटात २० ते २५ स्पर्धक सहभागी झाले होते. सर्वांत वेगात टार्गेट पूर्ण केलेल्या स्पर्धकांना निवडण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली, आसाम, चंदीगड, पंजाब, राजस्थान आदींसह वेगवगेळ्या ठिकाणांवरून हजारोंच्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था इंडिया बुल्स कॉम्प्लेक्स येथे करण्यात आली आहे. विजेत्या स्पर्धकांची निवड इंडिया टीम सायकलिंग रेसिंगमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती या स्पर्धेचे आयोजक राजेंद्र सोनी यांनी दिली. आंतराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू राजेंद्र सोनी यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन दि.५ ते ८ मार्चदरम्यान करण्यात आले आहे. यापूर्वी मुंबई मध्ये १९९० पूर्वी अशा प्रकारची स्पर्धा भरविण्यात आली होती. सोनी स्पिन यांच्या पुढाकाराने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य सायकलिंग असोसिएशन यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. नवी मुंबई पोलीस, पनवेल पालिका, मुंबई पालिका, नवी मुंबई पालिका, सिडको महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन विभाग, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ, वातावरण फाउंडेशन, भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेड, रामशेठ ठाकूर स्पोर्टस् कॉम्प्लेक्स आदींचा प्रायोजकांमध्ये समावेश आहे.
राष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धेला पनवेलमध्ये सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 1:48 AM