कर्जत : भजनभूषण आणि टीव्ही स्टार भजनी गायक गजाननबुवा पाटील यांचे चिरंजीव आणि देशविदेशात भजनाचे कार्यक्रम करणारे कर्जत तालुक्यातील प्रसादबुवा पाटील यांना नवी मुंबई येथील अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात हा सोहळा पार पडला.
कर्जत येथे वास्तव्यास असलेले प्रसादबुवा पाटील यांना आपल्या वडिलांकडून सुंदर आवाजाची देण मिळाली आहे. गजानन बुवा पाटील यांचा वारसा प्रसादबुवा पाटील समर्थपणे जपत असून, प्रसादबुवा यांनी स्वत: अनेक ओव्या रचल्या आहेत. भजनाचे देशाबाहेर कार्यक्रम करणारे म्हणून प्रसादबुवा यांचा लौकिक असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग भजनाचे धडे गिरवण्यास येतात.
प्रसादबुवा गजानन पाटील यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर काम करीत असलेल्या अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया यांनी राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कारासाठी त्यांची निवड केली होती. यावेळी अभिनेते बाबा करडे, संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र सरदार, मिस्टर युनिव्हर्स सिमरन आहुजा या पाहुण्यांसह प्रसादबुवा पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील तसेच पौर्णिमा पेडणेकर, मधुकर पाटील, केशव पवार आणि प्रसन्न पाटील उपस्थित होते.