कर्जत/ नेरळ : कर्जतचे कोंढाणा धरणाचे काम बंद पडण्यास राष्ट्रवादीने केलेला भष्ट्राचारच जबाबदार असून, त्यांनी जनतेची मोठी लूट केली आहे. भ्रष्टाचाराचे दुसरे नाव राष्ट्रवादी आहे. सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीला शेतक-यांच्या स्वामीनाथन आयोगाची आठवण झाली. मग शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना का आठवण झाली नाही, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.कर्जत दहिवली मार्केट यार्ड येथे शनिवारी दुपारी भाजपा कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीने शेतकरी, गोरगरीब, ओबीसी जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आता सत्तेपासून अनेक वर्षे दूर राहावे लागणार असल्याची टीका फडणवीस यांनी केली. मेळाव्याला आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, अन्नपुरवठामंत्री रवींद्र चव्हाण, आमदार किसान कथोरे, आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर, आमदार बाळा भेगडे, अमित साटम, आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार देवेंद्र साटम, आरपीआय जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, किसन मोर्चाचे अध्यक्ष आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शिवसेनेचे माजी आमदार देवेंद्र साटम यांचे पक्षात शाल श्रीफळ देऊन स्वागत करत, एका देवेंद्रच्या मदतीला दुसरा देवेंद्र आला असून, या माध्यमातून विकासकामांना अधिक गती देता येईल, असे सांगत स्वागत केले. त्याच वेळेस देवेंद साटम यांनी केलेली कर्जत पनवेल लोकल सेवा सुरू करण्याची मागणी लक्षात घेऊन, त्यासाठी आठवडाभरातच प्रयत्न सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.बुडीत पेण अर्बन बँकेमुळे खातेदारांचे जे पैसे बुडाले आहेत, त्याच्या वसुलीसाठी बँकेची नैना प्रकल्पात येणारी जागा सिडकोने ताब्यात घेऊन, त्या माध्यमातून पैसे वसूल करून खातेदारांची पैसे परत करणार असल्याचा ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली, तसेच कर्जत तालुक्यातील पेज आणि चिल्हार नदी जोड प्रकल्प व्यवहार्य असल्यास त्याचाही विचार करण्यात येईल, अशी भूमिका मांडली.आंबेडकरवादी जनतेचे मुंडणकर्जतमध्ये शनिवारी मुख्यमंत्र्यांची सभा होती. मुख्यमंत्र्यांचा निषेध म्हणून आंबेडकरवादी, बहुजनवादी, संविधानप्रेमी, समतावादी पक्ष अशा संघटनांच्या सुमारे १५० कार्यकर्त्यांनीमुंडण करून निषेध व्यक्त केला. या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोरेगाव भिमा दंगली प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसून, त्यांना सरकार पाठिशी घालत असल्याच्या निषेधार्थहे आंदोलन करण्यात आले.
भ्रष्टाचाराचे दुसरे नाव राष्ट्रवादी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 1:05 AM