अलिबाग : रायगड जिल्ह्यातील माणगांव, तळा,पोलादपूर, खालापूर आणि म्हसळा या पाच नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला माणगांव आणि म्हसळा तर शिवसेनेला तळा आणि पोलादपूर या नगरपरिषदांमध्ये निर्विवाद यश लाभले तर खालापूरमध्ये शेतकरी कामगार पक्षाने यश संपादन करून आपला लाल बावटा फडकावला आहे.केंद्राच्या आणि राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजपाने या पाचही नगरपंचायती काबीज करण्याकरिता रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या नेतृत्वाखाली मोठा चंग बांधून प्रचार केला होता, मात्र या पाचही नगरपंचायतींमध्ये मतदारांनी भाजपाला स्पष्टपणे नाकारल्याने, एकाही नगरपंचायतीत भाजपाला सत्ता काबीज करता आलेली नाही. या पाच नगरपंचायतीतील निवडणूक झालेल्या एकूण ८५ जागांपैकी एकाही जागेवर भाजपाला यश मिळवता आले नाही. भाजपाप्रमाणेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देखील एकाही जागी यश मिळाले नाही. काँग्रेसला केवळ पोलादपूर नगरपंचायतीत ५ जागी, म्हसळा ३ जागी तर माणगांवमध्ये केवळ एका जागी यश मिळाले. परिणामी पाचपैकी एकाही नगरपंचायतीत काँग्रेसला सत्ता प्रस्थापित करण्याची संधीच राहिलेली नाही. म्हसळा नगरपंचायतीत तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत, तळा आणि पोलादपूर या नगरपंचायतीत शिवसेनेने निर्विवाद यश संपादन केल्याने तसेच जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीत ८५ पैकी सर्वाधिक ३५ नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले. तर माणगांव, खालापूर व म्हसळ््यातील अपयश शिवसेनेला अंतर्मुख करायला लावणारे आहे. माणगाव आणि म्हसळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली तरी उर्वरित तळा, पोलादपूर आणि खालापूरमधील राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. ८५ पैकी २८ नगरसेवक राष्ट्रवादीचे विजयी झाले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात दुसऱ्या स्थानावर आहे.खालापूरमध्ये नगरपंचायतीत शेकापने विजय संपादन केला आहे. परंतु उर्वरित चार नगरपंचायतीत शेकापक्षाला खाते उघडता आलेले नाही. ८५ पैकी १० नगरसेवक शेकापचे झाले असून शेकाप जिल्ह्यात तिसऱ्या स्थानावर आहे. (विशेष प्रतिनिधी)तळामध्ये शिवसेनेचा भगवा फडकलातळे : नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चारीमुंडया चित करीत ही नगरपंचायतवर शिवसेनेने यश मिळवले आहे. एकाही जागेवर उमेदवार निवडून आणता न आलेला काँग्रेस पक्ष प्रभाग क्रमांक १२ मध्ये चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. निवडणुकीत कृष्णा गावडे (राष्ट्रवादी), रोशनी सुर्वे (शिवसेना), प्रकाश गायकवाड (अपक्ष), आलिया खाचे, विठोबा चांडिवकर, राजश्री पिंपळे, लिलाधर खातू, नेहा पांढरकामे, वासंती तळकर, स्रेहा तळकर, कविता गोळे, चेतन चव्हाण (शिवसेना), मंगेश शिनवण, चंद्रकांत भोरावकर, सत्या हिलम (राष्ट्रवादी), संदिप मोरे , रेश्मा मुंढे (शिवसेना) या निवडून आल्या आहेत.पोलादपूरमध्ये सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडेपोलादपूर : प्रथमच झालेल्या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने मुसंडी मारली आहे. पोलादपूरमध्ये १७ पैकी १२ जागांवर उमेदवार विजयी झाल्याने या नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. काँग्रेसला ५, भाजपा ०, मनसे ०, शेकाप ०, राष्ट्रवादी ० व अपक्षांना ० जागा मिळाल्या. सेना, कॉंग्रेस वगळता अन्य पक्षांना एकही जागा मिळवता आली नाही.प्रभाग क्रमांक १ मधून शिवसेनेच्या सुनीता पार्टे, प्र.२ काँग्रेसच्या रेखा सोनवणे, प्र. ३ मध्ये काँग्रेसच्या शुभांगी भुवड, प्र. ४ मध्ये शिवसेनेचे प्रसन्न बुटाला, प्र. ५ मध्ये शिवसेनेच्या कल्पना सवादकर, प्र. ६ मध्ये शिवसेनेचे उमेश पवार हे बिनविरोध विजयी झाले. प्र. ७ मध्ये काँग्रेसचे सुभाष गायकवाड विजयी झाले, प्र. ८ शिवसेनेचे प्रकाश गायकवाड, प्र. ९मधून काँग्रेसच्या शुभांगी चव्हाण, प्र. १० मध्ये शिवसेनेच्या संगीता इंगवले, प्र. ११ मध्ये शिवसेनेच्या आयुषी पालकर, प्र. १२मध्ये शिवसेनेचे सिद्धेश शेठ, प्र. १३ मध्ये शिवसेनेचे राजन पवार, प्र. १४मध्ये शिवसेनेचे नीलेश सुतार, प्र. १५ मधून शिवसेनेच्या अश्विनी गांधी, प्र. १६ मधून काँग्रेसचे नागेश पवार, प्र.१७ मध्ये शिवसेनेच्या सिद्धिका लोखंडे विजयी झाल्या. मोतमोजणीच्या वेळी चोख पोलीस बंदोबस्त होता.माणगावमध्ये राष्ट्रवादीने मारली बाजीमाणगाव : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून राहिलेल्या माणगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १७ पैकी ११ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले असून शिवसेनेला ५ जागांवर तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. येथे भाजपाला खाते खोलता आले नाही. प्रभाग १ मधून रिया उंभारे (राष्ट्रवादी ), प्रभाग २ दिलीप जाधव (राष्ट्रवादी ) प्र. ३ भाग्यश्री यादव (राष्ट्रवादी काँग्रेस),प्रभाग क्र. ४ जयंत बोडेरे (राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष), प्रभाग क्र. ५ हर्षदा सोंडकर (शिवसेना), प्रभाग क्र. ६ सानिया मयूरशेठ (शिवसेना), प्रभाग क्र. ७ आनंद यादव (राष्ट्रवादी काँग्रेस) प्रभाग क्र. ८ नितीन वाढवळ (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग क्र. ९ सचिन बोंबले (शिवसेना). प्रभाग १० संदीप खरंगटे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग ११ रत्नाकर उभारे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग १२ नितीन दसवते (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग १३ शुभांगी जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग १४ अंजली पवार (काँग्रेस आय), प्रभाग १५ योगिता चव्हाण (शिवसेना), प्रभाग १६ माधुरी मोरे (शिवसेना पुरस्कृत अपक्ष), प्रभाग १७ नीलम मेहता (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी विजय मिळवला.
राष्ट्रवादी, शिवसेनेला नगरपंचायतीत यश
By admin | Published: January 12, 2016 12:55 AM