नेरळमध्ये नैसर्गिक नाला बंद !
By admin | Published: February 1, 2016 01:39 AM2016-02-01T01:39:31+5:302016-02-01T01:39:31+5:30
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील पाडा भागात असलेला नैसर्गिक नाला त्या परिसरात जमीन विकसित करीत असलेल्या बिल्डरने बंद केला आहे.
कर्जत : नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील पाडा भागात असलेला नैसर्गिक नाला त्या परिसरात जमीन विकसित करीत असलेल्या बिल्डरने बंद केला आहे. बंद झालेल्या नाल्यामुळे पावसाचे पाणी लोकवस्तीमध्ये घुसण्याची शक्यता आहे. घरादारात पावसाचे पाणी जाण्याच्या भीतीने पाडा ग्रामस्थ हवालदिल झाले असून त्यांनी नेरळ ग्रामपंचायतीकडे नैसर्गिक नाला पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.
माथेरानकडे जाणारी मिनीट्रेन नेरळच्या पाडा भागातून जात असताना स्वामी कंपनीजवळ असलेल्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहत असते.पूर्वीपासून वाहत असलेल्या त्या नाल्याचा मार्ग लक्षात घेऊ न रेल्वेने मिनीट्रेन मार्गावर पूल तयार केला आहे, तो पूल शंभर वर्षांपूर्वीचा आहे. दुसरीकडे मध्य रेल्वेची मेन लाइन याच भागातून जाते. त्याठिकाणी देखील रेल्वे प्रशासनाने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पूल बांधला आहे. अशी सर्व स्थिती असताना स्वामी कंपनी परिसरात गेली काही वर्षे इमारती बांधल्या जात असून तेथील जमीन विकसित करीत असलेल्या बिल्डरने नैसर्गिक नाला बंद करण्याचा घाट घातला आहे.
या नैसर्गिक नाल्याला एवढे प्रचंड पाणी असते की पावसाळ्यात तो नाला कोणालाही ओलांडून जाता येत नाही. त्या नैसर्गिक नाल्यामुळे खरे तर नेरळ पाडा ग्रामस्थ पावसाच्या दिवसात निर्धास्त असतात. मात्र तेथील जमीन विकसित करीत बिल्डरने नैसर्गिक नाला बंद करण्यासाठी अनेक वेळा नाल्यात बांधकाम केले आहे. आतापर्यंत नेरळ ग्रामपंचायतीने तब्बल दोन वेळा नैसर्गिक नाल्यात करण्यात आलेले बांधकाम तोडून टाकण्याची कार्यवाही केली आहे. मात्र आता संपूर्ण नाला आपल्या जागेत असल्याच्या अविर्भावात त्या बिल्डरने मातीचा भराव करून काटेरी कुंपण टाकण्याचे काम पूर्ण केले आहे.
नैसर्गिक नाल्यात करण्यात आलेला भराव आणि त्यामुळे बंद झालेला नाला यामुळे पावसाचे पाणी परिसरात कुठेही जाऊ शकते, त्याचवेळी नाल्याच्या आसपास असलेल्या घरात पाणी घुसण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेऊन पाडा भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांनी नेरळ ग्रामपंचायतीकडे धाव घेतली असून नैसर्गिक नाला पुन्हा खुला करून देण्याची मागणी केली आहे. येथील ग्रामस्थ आणि तरुणांनी नेरळ ग्रामपंचायतीला निवेदन दिले असून नैसर्गिक नाला मोकळा करून देण्याची मागणी केली आहे. त्या निवेदनावर ग्रामस्थ भावेश दळवी, वैभव ठाकूर, सुनील चंचे, अशोक चंचे, सुनील कराळे, नीलेश शिनारे, प्रदीप जोशी, संतोष पवार आदींच्या सह्या आहेत.
याच भागात नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री कोकाटे, सदस्य सन्नी चंचे यांचे वास्तव्य आहे, त्यामुळे बंद झालेला नैसर्गिक नाला लवकर खुला होईल अशी सर्व नागरिकांना खात्री आहे.(वार्ताहर)