नेरळमध्ये नैसर्गिक नाल्यात बांधकाम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:21 PM2019-06-02T23:21:19+5:302019-06-02T23:22:33+5:30
पावसाचे पाणी वाहून जाण्यात अडथळा : चिंचआळी लोकवस्तीत पाणी शिरण्याची शक्यता
नेरळ : नेरळ गावातील चिंचआळी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असून, तेथील साईकृपा व्हॅली या ग्रहसंकुलातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी चक्क नैसर्गिक नाल्यात बांधकाम सुरू केले आहे. या नाल्यातील बांधकामामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यात अडथळे निर्माण होणार असून जास्त पाऊस असेल त्या वेळी कदाचित चिंचआळीमधील रहिवाशांच्या घरात पाणी शिरू शकते.
नेरळ-माथेरान रस्त्यालगत असलेल्या चिंचआळी भागात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गृहसंकुल उभे राहत आहेत. सध्या तेथे साईकृपा व्हॅली या ठिकाणी असलेल्या इमारतींमधील सांडपाणी वाहून नेण्यासाठी पाइप टाकले जात आहेत. मात्र, त्या वेळी त्या पाइपच्या सभोवती सिमेंट काँक्रीटचे बांधकामदेखील केले जात आहे. जे बांधकाम करताना संबंधित जमीन विकासक यांनी सिमेंट बांधकाम करताना ते पुढे नाल्यात केले आहे. ते करताना माथेरानच्या डोंगरावरून वाहून आलेल्या पाण्याचा नाला हा आकाराने लहान होत आहे. पावसाळ्यात माथेरानच्या डोंगरातून वाहून येणारे पाणी या नाल्यातून दुथडी भरून वाहून जात असते. दरवर्षी महापुराची स्थिती असेल, तेव्हा त्या नाल्यातील पाणी चिंचआळी भागातील घरांमध्ये जाते. ही वस्तुस्थिती असतानाही साईकृपा व्हॅली या विकासकाने टाकलेल्या पाइपभोवती केलेल्या बांधकामामुळे नाल्याचा आकार अर्ध्यावर आला आहे. त्यामुळे नाल्याची पावसाळ्यातील पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली असून, या वर्षी थोडेसे जरी पावसाचे प्रमाण वाढले तरी चिंचआळी भागातील काही घरात नाल्याचे पाणी जाऊन मोठे नुकसान होऊ शकते.
याबाबत स्थानिक रहिवासी यांनी नेरळ ग्रामपंचायत, कर्जत तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन आवाहन केले आहे. या नाल्यात झालेले बांधकाम न हटविल्यास पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाली असून, नेरळ ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या तक्रारी आल्यानंतर घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पावसाळा जसा जवळ येईल, तसे चिंचआळी ग्रामस्थांची झोप उडून जाणार असून ग्रामपंचायत जोवर नाल्यातील बांधकाम दूर करून नाला नैसर्गिक स्थितीत आणून ठेवत नाही, तोवर चिंचआळी ग्रामस्थांना झोप लागणार नाही.
साईकृपा व्हॅली या संकुलातून निघणारे सांडपाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या पाइपलाइनचेनंतर नाल्यात केलेले बांधकाम दूर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक नाल्यात बांधकाम करण्यापूर्वी असलेले नियम पाळले पाहिजेत, असे सूचित करण्यात आले आहे. - राजेंद्र गुडदे, ग्रामविकास अधिकारी, नेरळ ग्रामपंचायत
आमच्या भागात पावसाळ्यात यापूर्वीदेखील पाणी यायचे, सतत पाऊस सुरू असेल तर घरातदेखील पाणी येते. त्यात आता नाल्याचा आकार कमी झाला तर मात्र नाल्याचा मार्ग बंद होऊन पाणी थेट चिंचआळीमधील घरांत पोहोचणार आहे हे धोकादायक असून शासनाने तो नाला तत्काळ बांधकाममुक्त करावा. - संजय गवळी, ग्रामस्थ, चिंचआळी