वणव्यांमध्ये होरपळतेय रायगडची निसर्गसंपदा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 01:27 AM2021-03-10T01:27:09+5:302021-03-10T01:27:37+5:30
वनविभागाच्या उदासीन धोरणामुळे तत्काळ उपाययोजना नाही; श्रीवर्धनमधील वेळासच्या डोंगरावरील वनसंपत्तीची हानी
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी रस्त्याला असणाऱ्या वेळास गावाच्या हद्दीतील वनविभागाच्या डोंगराला लागलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीची हानी झाली असून जनावरांचा चाराही नष्ट झाला. मात्र या वणव्यांकडे वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवते.
वनविभागाच्या हद्दीत असणाऱ्या वेळास परिसरातील डोंगरावर रविवारी रात्री वणवा लागला. या वणव्यात जवळपास दोन ते पाच हेक्टर परिसर जाळून खाक झाला . यात लहान झाडे, शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठविलेल्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वणवा विझवण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे जाळपट्टे काढले जात नाहीत. त्यामुळे डोंगरच्या डोंगर आणि वनविभागाच्या हद्दीतील झाडे या वणव्यांच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
वनविभागाचे दुर्लक्ष
श्रीवर्धन तालुक्यातील अनेक गावांच्या हद्दीत असलेल्या वनविभागाच्या जंगलाला दरवर्षी वणवे लागतात. मात्र वणवे रोखण्यासाठी वनविभागाकडून प्रभावी उपाय योजना केल्या जात नाही . शासन एकीकडे झाडे लावण्यासाठी प्रचंड अनुदान देते , जनजागृती करीत वृक्ष लावगड करते. तर दुसरीकडे वनविभागाच्या दुर्लक्षामुळे जंगल संपत्तीचे मात्र मोठे नुकसान होते. जाळपट्टे वेळेत काढले जात नसल्याने वणवे लागत आहेत.
आठ दिवसांतील दुसरी घटना
या परिसरात दांडगूरी नंतर वेळास या ठिकाणी वणव्याची दोन आठवड्यातील दुसरी घटना आहे. दरवर्षी लागणारे वणवे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी. वनविभागाने याकडे लक्ष द्यावे आणि जंगल संपत्ती वाचविण्याचे प्रयत्न करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी केली आहे.
वेळास गावालगतच्या डोंगराला लागलेला वणव्यात अनेक वन्यजीव जळून मृत्यूमुखी पडले. दरवर्षी वणवे लागतात. मात्र, वनविभागाकडे तत्काळ वणवे विझवण्यासाठीची यंत्रणाच उपलब्ध नसते ही शोकांतिका आहे.
- धवल तवसाळकर, हेल्प ग्रुप, वेळास