- अरुण जंगमम्हसळा : दिसायला किळसवाणा, तरीही स्वभावाने शांत असलेल्या व सध्या दुर्मीळ होणारा पक्षी म्हणजे गिधाड. या पक्षाचे संवर्धन रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात होत असून, सिस्केप या संस्थेचे प्रमुख प्रेमसागर मेस्त्री यांनी गिधाडांची संख्या नैसर्गिक पद्धतीने वाढविण्याची चळवळ उभी करून तेथील जंगल टिकविण्याचे काम केले आहे. हेच काम आता पर्यावरण संतुलनासाठी मार्गदर्शक ठरत आहे. मात्र, ३ जून रोजी आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामध्ये म्हसळा तालुक्यातील गावांना जबरदस्त फटका बसला. वादळाने बहुतेक वनराई नष्ट झाली आहेत. यामुळे संपूर्ण डोंगर भागातील या गिधाडांची घरटी असलेली झाडे या वादळात नष्ट झाली, तर काही गिधाडे मृत अवस्थेत सापडली असल्याचे सिस्केपचे संस्थापक प्रेमसागर मेस्त्री यांनी ‘लोकमत’ला सांगितले.श्रीवर्धनला जाताना म्हसळ्याच्या अलीकडेच देहेन, भापट परिसरातून वर पाहिलं तर आकाशात घिरट्या घालणाऱ्या गिधाडांचा थवा आपल्या नजरेत येतो. म्हसळा तालुक्यातील चिरगाव-बागेची वाडी हे सध्या गिधाडांचे आश्रयस्थान बनले असून, या चिरगाव-बागेची वाडी येथील ३१.२१ हेक्टर क्षेत्रफळातील व समुद्रसपाटीपासून ३५० ते ४५० फूट उंचीवर असलेल्या जंगलात आंबा, अर्जुन, बेहडा, शेडाम, वनभेंड, इरडा, सातविण या जातीच्या उंच व दरीच्या कठड्यावरील झाडांवर गिधाडांची घरटी पाहायला मिळतात. घरट्यांच्या आसपास साधारणत: २० ते २५ गिधाडांचा वावर आणि आकाशात ३८ ते ४० गिधाडांचा विहार पाहायला मिळत असे. म्हसळा वनखाते आणि चिरगाव-बागेची वाडी येथील ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून महाडच्या सिस्केप संस्थेचे प्रमुख प्रेमसागर मेस्त्री यांनी मागील काही वर्षांपासून म्हणजेच १९७० पासून गिधाड संवर्धनाची नैसर्गिक मोहीम राबविल्याने सध्या गिधाडांच्या संख्येत वाढ झाली. मात्र, या गिधाडांनाही वादळाचा फटका बसला आहे. गिधाडांची घरटी असलेली झाडे उन्मळून पडल्याने या सिस्केपच्या कार्यात खंड पडला आहे. वादळापूर्वी या भागात गिधाडांची साधारणत: ४० पिल्ले घरट्यांमध्ये होती. वादळानंतर म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यात बचाव पथकास फक्त ७ ते ८ पिल्ले आढळली असल्याचे प्रेमसागर मेस्त्री यांनी सांगितले. गिधाडांची संख्याही ३० ते ४० असून, गिधाडांनी वादळाचा ज्या भागात प्रभाव नव्हता, त्या ठिकाणी स्थलांतर केले असावे अथवा वादळात सापडले असावे, असा प्राथमिक अंदाज असल्याचे सांगितले.स्थलांतर होण्याची शक्यता कमीगिधाडांची संख्या आजमितीस ३० ते ४० असली, तरीही त्यांची स्थलांतर होण्याची शक्यता फार कमी आहे. पुढील आठवड्यात वन विभागाच्या मदतीने मृत जनावरांचे मांस किंवा बोकडांचे मांस त्यांना घातल्यानंतर त्यांची संख्या निश्चित होईल. गिधाडांना बंदिस्त जागेत न ठेवता, त्यांना योग्य आहार देऊन त्यांची संख्या वाढविणारा देशातील हा पहिला उपक्रम आहे. मात्र, वादळामुळे फार नुकसान झाले असून, याचा परिणाम गिधाडांच्या संख्येवर झाला आहे.
‘निसर्ग’चा गिधाडांनाही फटका; वादळात झाडांबरोबर घरटी नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 1:17 AM