सोनसावरीला कोण सावरणार? होळीसाठीच्या कत्तलीमुळे संक्रांत
By निखिल म्हात्रे | Published: April 19, 2024 01:48 PM2024-04-19T13:48:45+5:302024-04-19T13:50:43+5:30
चैत्रात सावरीच्या झाडांना सध्या बहर आला आहे.
निखिल म्हात्रे, अलिबाग : चैत्रात सावरीच्या झाडांना सध्या बहर आला आहे. त्यामुळे परिसराचे सौंदर्य खुलून दिसते. मात्र, एकेकाळी मोठ्या संख्येने दिसणाऱ्या पिवळ्या फुलांच्या सावरीचे अर्थात सोनसावरीच्या झाडांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने निसर्गप्रेमी चिंता व्यक्त करत आहेत.
साधारणत: लाल काटेसावर सर्वत्र आढळून येते. त्यामुळे सर्वांनाच लाल काटेसावरविषयी माहिती असते. मात्र, पिवळी फुले येणारी काटेसावरीचे झाड क्वचित आढळून येते. अलिबाग तालुक्यातही चांगली वनसंपदा आहे. तालुक्यात लाल काटेसावर आढळून येते. मात्र, तालुक्यातील धोकवडे आणि झिराड परिसरात पिवळी काटेसावरची झाडे आहेत. सध्या ही झाडे पिवळ्या फुलांनी डरडरून गेली आहे.
वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संस्थेचे सदस्य समीर पालकर आणि निसर्गप्रेमी रूपेश गुरव यांनी सांगितले की, पिवळ्या काटेसावरी झाडे कमी होत आहेत. दुर्मीळ वनस्पतींचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
सावरीची महती काय?
काटेरी सावर हा वृक्ष पूर्ण भारतभर जंगलात वाढलेला आढळतो. याचे पानझडी वृक्ष जंगल, डोंगरकपारी, रस्त्याच्या कडेला तसेच शेताच्या बांधावर उंच वाढलेले दिसतात. झाडाच्या मुळापासून ते उंच टोकापर्यंत टोकदार काटे असणाऱ्या काटेसावर या झाडाची शाल्मली अशी देखील ओळख आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत सावरीची सगळी पाने गळून जातात. जानेवारीत अनेक कळ्या पानेविरहित फांदीवर दिसतात. फेब्रुवारी ते मार्चपर्यंत सर्व झाड लाल-गुलाबी फुलांनी बहरून जाते. काटेसावरीची झाडे ३० ते ४५ मीटरपर्यंत उंच वाढतात. हे झाड खोडापासून टोकापर्यंत त्रिकोणी काट्यांनी लगडलेले असते. उन्हाळ्यात पानगळ झाल्यावर काटेसावरला फुले येतात.
अलिबाग परिसरात लाल आणि पांढऱ्या रंगाची फुले येणारी काटेसावर आढळून येते. पिवळी काटेसावर माेठ्या प्रमाणात आढळून येत नाही. पिवळी काटेसावर दुर्मीळ आहे. पिवळ्या काटेसावरीला सोनसावर म्हणतात. सोनसावर महाबळेश्वर परिसरात, पश्चिम घाटाच्या वरच्या पट्ट्यात आढळून येते. अलिबाग परिसरात आढळून आली असेल तर वनविभागाकडून त्या झाडाची माहिती घेतली जाईल. ते झाड सोनसावरीचे असेल तर त्याची रोपे तयार करण्यासाठी बीज जमा करण्यात येतील.-नरेंद्र पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी, अलिबाग वनविभाग
काटेसावरीची लागते होळी-
काही भागात काटेसावरीची होळी लावून तिचे दहन केले जाते. त्यामुळे होळीनिमित्त मोठ्या प्रमाणात या झाडांची कत्तल करण्यात आली. जंगलात वणवा लागला, तर सगळ्यात शेवटी जळणारं झाड म्हणून देखील काटेसावरची ओळख आहे. यामुळेच काटेसावरीचे झाड तोडून होळीच्या मध्यभागी ठेवून त्याची पूजा केली जाते. दरवर्षी होळीच्या निमित्ताने काटेसावरीची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. जंगलातील काटेसावर नष्ट होऊ नयेत, होळीत जाण्यासाठी याचा वापर थांबावा, यासाठी जनजागृती आणि प्रयत्नांची गरज आहे.