पनवेलमध्ये १६२ गावांना ‘निसर्ग’चा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 12:38 AM2020-06-09T00:38:10+5:302020-06-09T00:38:50+5:30
शासनाच्या मदतीची प्रतीक्षा : पावसाळ्याच्या तोंडावर नुकसानग्रस्त घरांच्या दुरुस्तीसाठी धावपळ
वैभव गायकर ।
पनवेल : निसर्ग चक्रीवादळाचे केंद्र असलेल्या रायगड जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातदेखील या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. या वादळामुळे तालुक्यातील सुमारे १६२ गावे व आदिवासी वाड्यांमध्ये नुकसान झाले आहे.
महसूल विभागामार्फत गावनिहाय तलाठी तसेच ग्रामसेवकांमार्फत झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. या वादळाचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागाला बसला आहे. तालुक्यात एकूण १९५० घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक घरांच्या भिंती कोसळल्या आहेत तर अनेक घरांची छते उडाली आहेत.ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हे अस्मानी संकट कोसळल्याने अनेक ग्रामस्थ व आदिवासी बांधवांची घरांच्या दुरुस्तीची लगबग सुरू झाली आहे. लॉकडाऊनमध्ये नुकतीच मोकळीक मिळाली आहे. मात्र घरांच्या दुरुस्तीसाठी लागणारे पत्रे, कौले मिळत नसल्याने अनेक जण हवालदिल झाले आहेत. घरांची दुरुस्ती सुरू असताना पावसाला सुरुवात झाल्यास पुन्हा एकदा अनेकांचे संसार उघड्यावर येण्याची शक्यता आहे. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू आहेत. दोन ते तीन दिवसांत हे पंचनामे पूर्ण होतील, अशी माहिती तहसीलदार अमित सानप यांनी दिली.
पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात फार्महाउस आहेत. मुंबई उपनगरातील बड्या हस्ती तसेच धनाढ्यांचे हे फार्महाउस आहेत. या फार्महाउसनादेखील मोठा फटका बसला आहे. जवळजवळ ५०० फार्महाउसना निसर्ग वादळाचा फटका बसला आहे. अनेक फार्महाउसमधील झाडे कोसळली आहेत तर अनेक फार्महाउसची छते उडाली आहेत. शहरी भागातील मोठमोठ्या इमारतींवरील वेदर शेड (पत्रे ) जोरदार वादळामुळे उडाली आहे.
तालुक्यात ३५० विजेचे खांब उन्मळून पडल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा दोन दिवस खंडित झाला होता. हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र महावितरणचेदेखील मोठे नुकसान यामुळे झाले आहे. ५० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. पंचनाम्याच्या अंतिम अहवालात नुकसान झालेल्या विविध भागांची खरी आकडेवारी समोर येईलच.
१६२ गावांना निसर्ग वादळाचा फटका बसला आहे. यामध्ये आदिवासी वाड्यांचादेखील समावेश आहे. या नुकसानग्रस्त ठिकाणांचे पंचनामे ग्रामसेवक, तलाठी यांच्या मार्फत सुरू आहेत. दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील.
- अमित सानप, तहसीलदार, पनवेल
५०० फार्महाउसना फटका
१पनवेल तालुक्यात नेरे, मालडुंगी, वाजे, कर्नाळा परिसरात मोठ्या प्रमाणात फार्महाउस आहेत. मुंबई-उपनगरातील बड्या हस्ती, धनाढ्यांचे सेकंड होम म्हणून हे फार्महाउस आहेत. या फार्महाउसनादेखील निसर्ग वादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक फार्महाउसमधील झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच मोठ्या फार्महाउसेसची छते सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडाली आहेत.
लवकरात लवकर मदतीची गरज
२लॉकडाऊनच्या काळात मागील तीन महिन्यांपासून घरीच बसल्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे. अशा परिस्थितीत निसर्ग वादळाच्या फटाक्यामुळे घरे दुरुस्तीसाठी आर्थिक अडचण निर्माण झाल्याने शासनाने लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.