निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचे संसार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 12:01 AM2020-06-06T00:01:57+5:302020-06-06T00:02:10+5:30

कर्जत शहरातील स्वप्ननगरी, नानामास्तर, महावीरपेठमध्ये रस्त्यावर झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. विजेच्या तारांवर झाडे कोसळणे, खांब कोसळणे यामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

Nature's cyclone opened the world to many | निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचे संसार उघड्यावर

निसर्ग चक्रीवादळाने अनेकांचे संसार उघड्यावर

Next

विजय मांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : अरबी समुद्रात भयंकर रूप धारण करत कोकणात धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी दुपारी रायगड जिल्ह्याला लक्ष्य केले. यामध्ये कर्जत, नेरळ, माथेरान या शहरांसह ग्रामीण भागाला तडाखा बसला.


कर्जत शहरातील स्वप्ननगरी, नानामास्तर, महावीरपेठमध्ये रस्त्यावर झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. विजेच्या तारांवर झाडे कोसळणे, खांब कोसळणे यामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. माथेरानमध्ये राम बाग पॉइंट येथील आशा पार्टे यांच्या घराचे पत्रे उडून भिंतीदेखील बाधित झाल्या आहेत.


माथेरान इंदिरानगरमधील रवी जाबरे यांचे घर कोसळल्याची घटना घडली आहे. तर नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील जुमापट्टी येथील भाग बाबू आखाडे यांच्या घरावरील संपूर्ण पत्रे उडून मागील घरावर जाऊन दोन घरांचे नुकसान झाले. मनोहर पादीर यांच्या घरावरील कौले उडून गेली आहेत तर भाताचा पेंडा संपूर्णत: भिजून गेला आहे. यासह मोहचीवाडी येथील अर्जुन हिलम यांच्यादेखील घरावरील छप्पर उडून गेले आहे.


शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळणे, विद्युत खांब पडणे, विद्युत तारा तुटणे, घरावरील कौल, पत्रे उडून जाण्याच्या घटना घडत असताना नेरळजवळील धामोते गावातदेखील झाडे कोसळणे यासोबत नव्याने बांधलेले गणेश डायरे यांचे मातीचे घरावरील पत्रे उडून भिंती बाधित झाल्या आहेत.


डोळ्यादेखत बांधलेले खोपटे उघडे पडल्याने डायरे कुटुंबाच्या अश्रूंचा बांध फुटला होता. तर जामरुंग, मोग्रज, पाथरज, खांडस, ओलमन, चई येथील गावांसह आदिवासी वाड्या, पाडे या चक्रीवादळामुळे बाधित झाले आहेत. वासराच्या खोंड्यातही खूप नुकसान झाले आहे.
कोंकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीच्या छपराचे सुमारे साठ पत्रे उडून गेल्यामुळे खूप नुकसान झाले आहे.
वादळानंतर उधाणलेल्या स्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन जीवाचे रान करीत आहे. धाबेवाडी, रजपे वाडी, धोत्रे वाडी आदी भागांत जाऊन तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख हे स्वत: परिस्थितीची पाहणी करून उपाययोजना राबवत आहेत. त्यामुळे त्या भागातील रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करून रस्ते मोकळे करण्यात आलेले आहेत.


महावितरणचेदेखील या वादळात मोठे नुकसान झाले असताना या प्रसंगावर महावितरणचे कर्मचारी अधिकारी हे मात करण्यासाठी वादळ शमल्यापासून अहोरात्र मेहनत घेत आहेत. उपअभियंता योगेश साबळे आणि सूर्यकांत माने यांनी उपलब्ध मोजक्याच कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन खोपोली ते कर्जत अशी पायपीट करून ज्या ज्या ठिकाणी वीज प्रवाहात अडचण होती ती दूर करून अवघ्या ३४ तासांत कर्जत शहरात वीजपुरवठा सुरू केला.
 

निसर्ग चक्रीवादळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मी स्वत: तालुक्यातील आदिवासी भागात फिरत आहे. शक्य त्या सर्व उपाययोजना आम्ही राबवत आहोत. यासह नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश सर्व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
- विक्रम देशमुख,
तहसीलदार, कर्जत

Web Title: Nature's cyclone opened the world to many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.