उरणमधून बेपत्ता झालेला नौदल अधिकारी १२ दिवसांनी सापडला झांसीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 07:07 PM2022-11-18T19:07:14+5:302022-11-18T19:07:48+5:30

शेवटचे मोबाईल लोकेशन पनवेल रेल्वे स्टेशन दाखविण्यात आले होते

Naval officer who went missing from Uran found in Jhansi after 12 days | उरणमधून बेपत्ता झालेला नौदल अधिकारी १२ दिवसांनी सापडला झांसीत

उरणमधून बेपत्ता झालेला नौदल अधिकारी १२ दिवसांनी सापडला झांसीत

Next

मधुकर ठाकूर, उरण : उरण येथुन मागील १२ दिवसांपासून बेपत्ता असलेला नौदल अधिकारी विशाल महेश कुमार (२२) अखेरीस झांसीमध्ये संदिग्ध स्थितीत सापडला आहे. त्याला या १२ दिवसातील प्रवासातील घडलेला घटनाक्रम  काही केल्या आठवत नसल्याने नौदलाच्या अधिकाऱ्यांनी उपचारासाठी मेरठ येथील त्यांच्या इस्पितळात आयसीयु विभागात दाखल करण्यात आला असल्याची माहिती तपास अधिकारी अनिरुध्द गिजे यांनी दिली. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील धपरौली गावातील विशाल महेश कुमार (२२) हा जवान १९ महिन्यांपूर्वी उरण- करंजा येथील नौदलाच्या सेवेत दाखल झाला होता.नौदल शस्त्रागारातील आयएनए-अभिमन्युमध्ये सेफ (स्वयंपाकी) म्हणून काम करणारा जवान अधिकारी ३ नोव्हेंबरपासून अचानक बेपत्ता झाला होता.त्यामुळे नौदल अधिकाऱ्यांनी विशालच्या आईवडीलांना तत्काळ बोलावून घेऊन माहिती दिली होती.त्यानंतर विशालचे वडिल महेश कुमार यांनी ६ नोव्हेंबर रोजी मिसिंगची तक्रार उरण पोलिस ठाण्यात दाखल केली होती.

उरणच्या विमला तलावात ३ नोव्हेंबर रोजी सकाळी स्विमिंगसाठी आलेल्या विशालचे शेवटचे मोबाईल लोकेशन पनवेल रेल्वे स्टेशन दाखविण्यात आले होते. या प्रकरणी उरण पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. मात्र विशालचा मोबाईल फोन बंद असल्याने बेपत्ता विशालचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही.तब्बल १२ दिवसांनंतर १४ नोव्हेंबर रोजी विशालला आपण झांसीमध्ये असल्याची जाणीव झाली. फाटके मळके आणि अशक्त अवस्थेत असलेल्या विशालला उरणपासुन झाशीपर्यंत कसे पोहचलो हे मेंदूला ताण देऊन आठवेना.अंगावरील छिन्नविछिन्न झालेल्या कपड्यातील कप्प्यात नौदलाचे ओळखपत्र सापडले. या ओळखपत्राच्या आधारावर आणि नागरिकांच्या मदतीने १४ नोव्हेंबर रोजी म्हणजे बेपत्ता झाल्यानंतर तब्बल १२ दिवसांनी दरमजल करून धपरौली गावातील घर गाठले.घरच्यांनी तत्काळ उरण पोलीस, नौदल अधिकाऱ्यांना माहिती दिली.

नौदल अधिकाऱ्यांनी विशाल याला उपचारासाठी मेरठ येथील नौदलाच्या इस्पीतळात दाखल केले आहे. त्याला १२ दिवसातील घटनाक्रम काहीच आठवत नसल्याने त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती चुलत भाऊ अमन भटनागर यांनी दिली. तर या घटनेला तपास अधिकारी अनिरुध्द गिजे यांनीही दुजोरा दिला आहे. उपचारानंतर या प्रकरणी स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येईल अशी माहितीही गिजे यांनी दिली.

Web Title: Naval officer who went missing from Uran found in Jhansi after 12 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.