जिल्ह्यात नवरात्रोत्सवाचा जागर सुरू

By Admin | Published: October 1, 2016 02:59 AM2016-10-01T02:59:02+5:302016-10-01T02:59:02+5:30

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून, यंदा जिल्ह्यात १ हजार १३७ सार्वजनिक तर १७७ घरगुती अशा एकूण १ हजार ३१४ ठिकाणी देवींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

Navaratri festival jagar continues in the district | जिल्ह्यात नवरात्रोत्सवाचा जागर सुरू

जिल्ह्यात नवरात्रोत्सवाचा जागर सुरू

googlenewsNext

- जयंत धुळप, अलिबाग
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून, यंदा जिल्ह्यात १ हजार १३७ सार्वजनिक तर १७७ घरगुती अशा एकूण १ हजार ३१४ ठिकाणी देवींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. पारंपरिक घट स्थापनेला नवरात्रोत्सवात अनन्य साधारण महत्त्व असते. १६९ सार्वजनिक तर १,२०२ खासगी अशा एकूण १ हजार ३७१ ठिकाणी घटस्थापना करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ६०० सार्वजनिक ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
नवरात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता रायगड पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी जिल्ह्यात विशेष सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात नियमित पोलीस दलास सहाय्य करण्याकरिता राज्य राखीव दलाचे १०० जवान, दंगल नियंत्रणाकरिता विशेष चार पथके, स्ट्रायकिंग फोर्सची सहा पथके, ३०० पुरुष तर १०० महिला असे ४०० गृहरक्षक दलाचे जवान असा चोख पोलीस बंदोबस्त शुक्रवारपासूनच तैनात करण्यात आला आहे.
नवरात्रीत अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ असतो. गावदेवी मंदिरे अथवा अन्य देवीच्या मंदिरांमध्येही घटस्थापना केली जाते. नवरात्रीत देवीपुढे अखंड दीप लावला जातो. अलिबागची ग्रामदेवता असणाऱ्या आंग्रेकालीन काळंबामाता मंदिरात घटस्थापना करण्यात येते. नवरात्रोत्सवात मंदिर परिसरात यात्रा देखील भरते. अलिबाग शहरातील हिराकोट किल्ल्यातील काळंबा माता, हिराकोट तलाव किनाऱ्यावरील श्री राजराजेश्वरी देवी, कुलाबा किल्ल्यातील भवानी, वरसोली गावातील भवानी या मंदिरांसह जिल्ह्यात देवीच्या ६०० मंदिरांमध्ये घटस्थापना होणार आहे.

नवचंडी होम
नवरात्रोत्सव काळात देवळातून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात. ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, कल्याण करणारी आहे. या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते. ही शक्ती देवता देशभरात विविध नावांनी ओळखली जाते. नवव्या दिवशी नवचंडी होम करण्यात येतो. या उत्सवाला सुद्धा सध्या सार्वजनिक स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. मुलींना आवडणारा हादगा (भोंडला) हा सुद्धा याच दिवसात करतात. मुली पाटावर हत्ती काढून त्याच्या भोवती फेर धरतात. हादग्याची गाणी म्हणतात. नवनव्या खिरापती केल्या जातात.

अकरा दिवस धूम
पेण : घटस्थापना अर्थात आद्यशक्तीच्या शक्तीपूजेला उद्यापासून थाटात प्रारंभ होत आहे. गावोगावच्या ग्रामदेवता व कुलदैवतांच्या मंदिरांच्या ठिकाणी सारे आप्तजन कुळाचार सांभाळण्यासाठी ग्रामदेवता व कुलदेवतांच्या देवळांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येत असल्याचे ग्राम संस्कृतीमध्ये पहावयास मिळतात. ग्रामदेवतांच्या जोडीने कुलदेवांची मंदिरे गावोगावी नव्याने उभारली गेली.

आदिवासी वाडीत उत्सव
तळा : गणेशोत्सव संपला नाही तर सर्वत्र नवरात्रोत्सवाचे वेध सुरू होतात. शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो. तळा तालुक्यात ३० सार्वजनिक तर ५ ठिकाणी खाजगी असा ३५ ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. त्यात तारणे पिटसई शेनाटे यांच्या सारख्या आदिवासी वाड्यांवर उत्सव साजरा केला जातो.

नवरात्रोत्सवास प्रारंभ
नागोठणे : शिहू येथील श्री बहिरेश्वर मंदिरात अंबा माता, बहिरेश्वर, जोगेश्वरीमाता या देवतांची घटस्थापना करून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. दसऱ्यापर्यंत भजन, कीर्तन, नृत्य स्पर्धा, महिलांसाठी खेळ, आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

Web Title: Navaratri festival jagar continues in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.