नवगाव ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:35 AM2019-04-17T00:35:18+5:302019-04-17T00:37:58+5:30

एकीकडे निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे,

navgain villagers boycott elections | नवगाव ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

नवगाव ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

googlenewsNext

अलिबाग : एकीकडे निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे, तर दुसरीकडे अलिबाग तालुक्यातील साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या नवेदर-नवगाव ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नसल्याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. याआधी नागरिकांनी सलग दोन वेळा ग्रामपंचायतीमध्ये मतदान केलेले नाही. सध्या ग्रामपंचायतीवर गेली नऊ वर्षे प्रशासकामार्फतच कारभार केला जात आहे. कोळी समाजाच्या या निर्णयाचा फटका निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना बसणार
आहे.
नवेदर-नवगाव ग्रामपंचायतीमध्ये कोळी समाज मोठ्या संख्येने आहे. २००७ साली झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ११ पैकी आठ सदस्य कोळी समाजाचे निवडून आले होते; परंतु निवडून आलेल्या उमेदवारांकडे अनुसूचित जमातीचे दाखले नाहीत. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. त्यानंतर २०१२ आणि २०१७ साली झालेल्या निवडणुकीवर ग्रामस्थांनीच बहिष्कार टाकला होता. त्यानंतर १ जानेवारी २०१२ रोजी अलिबाग तहसीलदार यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. ग्रामपंचायतीमध्ये हिंदू महादेव कोळी या जातीच्या समुदायाची संख्या अधिक आहे. त्या अनुषंगाने अनुसूचित जातीचे आरक्षण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आहे. हिंदू महादेव कोळी या जातीच्या दाखल्यांना जात समितीकडून वैधता प्रमाणपत्र दिले जात नाही. १९५० पूर्वीच्या कुटुंबातील व्यक्ती हयात नाहीत ज्या हयाच आहेत. त्या अशिक्षित असल्यामुळे ५० वर्षांपूर्वीचे पुरावे त्यांना सादर करता येत नाहीत, असे ग्रामस्थ फिडी कटोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कोळी समाजाला सरकारकडून ठोस निर्णय मिळणार नाही तोपर्यंत पुढील सर्व लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर कायम बहिष्कार राहणार आहे. या निर्णयाचा फटका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसणार आहे.
दरम्यान, या आधी म्हसळा तालुक्यातील वाघाव बौद्धजन हितवर्धक मंडळाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.
>जातीचे दाखले ग्राह्य धरण्याची मागणी
हिंदू महादेव कोळी समाज येथे मोठ्या संख्येने असल्याने अनुसूचित जमातीचे आरक्षण काढण्यात येते; परंतु कोळी समाजापुढे जातीच्या दाखल्यांबाबत मोठी समस्या आहे. सर्वच लाकेप्रतिनिधी आणि प्रशासन केवळ आश्वासनच देत आहे, असेही कटोर यांनी स्पष्ट केले. कोळी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र दिल्यास सर्वच समस्या सुटणार आहेत. त्याचप्रमाणे गावाचा विकासही होण्यास मदत मिळणार असल्याकडे ग्रामस्थ धनंजय कोळी यांनी लक्ष वेधले.कोळी समाजाकडे असलेले जातीचे दाखले, पुरावे ग्राह्य धरून जात पडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र आणि सरकारने आम्हाला जातीचे प्रमाणपत्र द्यावीत, अशी मागणी केली.

Web Title: navgain villagers boycott elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.