अलिबाग : राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांचे चिरंजीव नविद अंतुले (५९) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकारच्या धक्क्याने निधन झाले. यांच्या पार्थिवावर मुंबईमधील बडा कब्रस्तानमध्ये बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. नविद यांच्या पश्चात त्यांच्या आई नर्गिस अंतुले, नीलम, मुबीना आणि शबनम या तीन बहिणी तसेच त्यांचे मेहुणे मुश्ताक अंतुले असा मोठा परिवार आहे. नविद हे अविवाहित होते.मंगळवारी रात्री नविद यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मुंबईतील सैफी रुग्णालयात नेत असतानाच त्यांना मृत्यूने कवटाळले. त्यांच्या निधनाचे वृत रात्रीच रायगड जिल्ह्यात पसरले. त्यांच्या म्हसळा तालुक्यातील आंबेत गावी हे वृत्त धडकताच नागरिकांना धक्का बसला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जेष्ठ नेते मुश्ताक अंतुले, जावेद परकार यांच्यासह अन्य अशा मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी अंत्यविधी पार पडला.नविद हे सुरुवातीपासूनच राजकारणापासून अलिप्त होते. मात्र २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरोधात त्यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले होते.शिवसेनेला जाहीर पाठिंबा देताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले होते. त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत समीकरण बदलल्याने त्यांचा राजकारणापासून दुरावा निर्माण झाला होता. असे असले तरी म्हसळा आणि श्रीवर्धनच्या विकासासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत होते.
नविद अंतुले यांचे हृदयविकाराने निधन, मुंबईत अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 5:33 AM