निखिल म्हात्रेअलिबाग : शनिवार १७ ऑक्टोबरपासून नवरात्रौत्सव सुरू होत असून, रायगडातही कोरोना कालावधीत असलेल्या अटी व शर्थींचे पालन करून नवदुर्गेची घटस्थापना करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सार्वजनिक व खासगी १ हजार २५३ मूर्ती, १ हजार ३१५ घट, तर २७१ फोटोंची स्थापना करण्यात येणार आहे.
यामध्ये १ हजार ५०१ सार्वजनिक मंडळ आपले मनोरंजनाच्या कार्यक्रमासह विविध उपक्रम राबवित असत. मात्र, कोरोनाची महामारी टाळण्यासाठी जिल्ह्यात अगदी शांततेत नवरात्रौत्सव साजरा होणार आहे. नवरात्रौत्सव हा गुजरात राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करीत असला, तरी हल्ली महाराष्ट्रातही सार्वजनिक मंडळामार्फत गरबा नृत्याचे आयोजन करण्यात येते. रायगड जिल्ह्यातही नवरात्रौत्सव काळात दुर्गामातेची स्थापना करून गरबा, रास गरबा यांचे आयोजन सार्वजनिक मंडळ व खासगी ठिकाणी केले जाते. मात्र, या वर्षी अख्या जगासमोर आलेल्या कोरोना संकटामुळे कुठेही रास गरबा, दांडिया यासह विविध मनोरंजनात्क कार्यक्रम रद्द झाले आहेत.जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवहनाला आता ग्रामीण भागातूनही पाठिंबा मिळत आहे.
घरोघरी मातेच्या स्वागताच्या तयारीची लगबग
यंदाच्या नवरात्रौत्सवावर कोरोनाचे सावट असले, तरी आई-भवानीच्या पाहुणचारात काही कमी राहायला नको, यासाठी घरोघरी स्वागताच्या तयारीची लगबग पाहायला मिळते आहे. नवरात्रौत्सव साधेपणात साजरा होत असला, तरी भक्तांचा आनंद मात्र तसूभरही कमी झालेला नाही. घराघरात रंगरंगोटी, आरास करण्याचे काम जोरात सुरू आहे. भवानी मातेच्या मूर्ती आधीच टेम्पोतून घरी आणण्यास सुरुवात झाली आहे.
१७ ऑक्टोबरपासून देशात नवदुर्गेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याासाठी सार्वजनिक मंडळ याचबरोबर खासगी ठिकाणीही अगदी साधेपणात साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात नवरात्रौत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.