उरणमध्ये आदिशक्तीच्या जागराला सुरुवात; सार्वजनिक ८५, खासगी ८६ मुर्तीची तर घटांची होणार स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2023 05:52 PM2023-10-14T17:52:33+5:302023-10-14T17:53:00+5:30
नऊ दिवस चालणार्या या नवरात्रौत्सवाची विशेषता तरूणाईत मोठी उत्सुकता लागून राहिलेली आहे.
मधुकर ठाकूर, उरण : रविवारपासून देशभर आदिशक्तीचा जागर सुरु होत आहे.उरणही त्याला अपवाद नाही.उरणमध्ये तीनही पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८५ सार्वजनिक मंडळ, खासगी ८६ मुर्ती आणि ८ घटांची स्थापना करण्यात येणार आहे. नऊ दिवस चालणार्या या नवरात्रौत्सवाची विशेषता तरूणाईत मोठी उत्सुकता लागून राहिलेली आहे.
उरण तालुक्यातील उरण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक- ५२, खासगी ४० मुर्ती आणि एक घट अशी स्थापना करण्यात येणार आहे.
न्हावा-शेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक- १०, खासगी मुर्ती -०८ व घट -०२ आहेत.तर मोरा सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २१ सार्वजनिक नवरात्रौ उत्सव मंडळ कार्यरत आहेत.खासगी-३२ तर एका घटाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती तीन्ही पोलिस ठाण्यातुन देण्यात आली.
यापैकी उरण शहरातील गुरुकुल ,जवाहरलाल नेहरू बंदर कामगार वसाहतीतील ऐश्वर्या कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचा ऐश्वर्या रास गरबा,चिरनेर येथील शिवसेना प्रणित नवरात्रौ उत्सव मंडळाचा गरबा,करंजा येथील नवापाडा मित्र मंडळाचा फक्त महिलांसाठी पारंपारीक वेशभूषा ड्रेसकोडच्या तालावर थिरकणारा गरबा आणि परिसरात इतर ठिकाणी सुरू झालेल्या रास-गरब्याची सर्वांनाच प्रतिक्षा लागून राहिलेली असते.अनेक मंडळांकडून ऐतिहासिक, पौराणिक कथांवर आधारीत आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणारे आकर्षक देखावे उभारून देवींची स्थापना करत असतात.तालुक्यातील काही ठराविक नवरात्रौत्सव मंडळ सातत्याने रास-गरबा नृत्याबरोबरच विविध सांस्कुतिक आणि मनोरंजनाचे कार्यामांचे आयोजन करीत असतात.
उरण परिसरातील आई जगदंबेची अनेक मंदीरे आहेत.त्यापैकी करंजा येथील द्रोणागिरी देवी ,उरण शहरातील उरणावती देवी, डोंगरीची अंबादेवी, नविन शेव्यामधील शांतेवरी देवी,जसखार येथील रत्नेवरी देवी,फुंडे येथील घुरबा देवी,चिरनेरच्या इंद्रायणीच्या डोंगरमाथ्यावर विराजमान असलेली आणि मोरा येथील एकवीरा देवी,पीरवाडी येथील मागीण देवी, डोंगरी येथील अंबादेवी अशा देवीच्या मंदीरात नवरात्रौ उत्सव दरम्यान देवीचा जागर केला जातो. नवसाला पावणारी,भक्तांच्या हाकेला धावणारी, भक्तांचे मनोरथ पुर्ण करणार्या या देवींवर उरणकरांची अपार श्रध्दा आहे.या श्रध्देमुळे नवरात्री उत्सव काळात परिसरातील विविध देवींच्या मंदिरात भावकांची गर्दी असते.