रायगडमध्ये राष्ट्रवादीकडे ४८ ग्रामपंचायती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 03:14 AM2018-09-28T03:14:36+5:302018-09-28T03:14:57+5:30

रायगड जिल्ह्यातील १२१ पैकी २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ९६ ग्रामपंचायतींकरिता बुधवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी संबंधित तहसीलदार कार्यालयांत करण्यात आली.

NCP has 48 Gram Panchayats in Raigad | रायगडमध्ये राष्ट्रवादीकडे ४८ ग्रामपंचायती

रायगडमध्ये राष्ट्रवादीकडे ४८ ग्रामपंचायती

googlenewsNext

विशेष प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १२१ पैकी २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ९६ ग्रामपंचायतींकरिता बुधवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी संबंधित तहसीलदार कार्यालयांत करण्यात आली. सर्वाधिक ४८ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने काबीज केल्या आहेत, तर २८ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आपला विजयी भगवा फडकावला आहे, तसेच १५ ग्रामपंचायतींवर शेकापक्षाने आपला लाल बावटा फडकावला आहे. काँग्रेसला ८ ग्रामपंचायतीत विजय संपादन करता आला आहे तर १६ ग्रामपंचायतीत स्थानिक राजकीय आघाड्यांनी विजय संपादन केला आहे. भाजपाला मात्र केवळ तीन ग्रामपंचायतीत यश मिळवता आले आहे. तीन ग्रामपंचायतीत नियोजित आरक्षणाचे उमेदवार मिळू शकले नसल्याने या तीन ग्रामपंचायतींची सरपंचपदे रिक्त राहिली आहेत.
अलिबाग तालुक्यातील सात ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना यांना प्रत्येकी दोन तर एका ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडीला यश मिळाले आहे. मुरुड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्थानिक आघाडीलाच यश मिळाले आहे. पेणमधील ९ ग्रामपंचायतींपैकी चार शेकापने काबीज केल्या आहेत तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना प्रत्येकी एका ग्रामपंचायतीत विजय मिळाला आहे.

कर्जत, माणगाव, तळा, म्हसळा आणि रोहा तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व अबाधित
कर्जतमध्ये १२ पैकी सर्वाधिक ७ राष्ट्रवादी काँग्रेसला, शेकाप आणि शिवसेनेला प्रत्येकी २ तर काँग्रेसला एका ग्रामपंचायतीत यश मिळाले आहे. खालापूरमध्ये एकूण तीनपैकी तीनही ग्रामपंचायती शिवसेनेने काबीज केल्या आहेत. माणगावमध्ये १० पैकी सर्वाधिक ६ शिवसेना तर राष्ट्रवादीने ४ जागी विजय मिळवला आहे. तळा तालुक्यातील १३ पैकी सर्वाधिक १२ राष्ट्रवादीने काबीज केल्या तर सेनेला एका ग्रामपंचायतीवरच समाधान मानावे लागले. रोहा तालुक्यात २२ पैकी सर्वाधिक २१ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने काबीज केल्या आहेत. म्हसळा तालुक्यात पाचपैकी तीन राष्ट्रवादी तर काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी एक ग्रामपंचायतीत यश आले आहे.

पोलादपूरच्या तीन ग्रामपंचायती शिवसेनेकडे, तर दोन शेकापकडे
पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील माटवण, सवाद, बोरावळे आणि चरई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. तालुक्यात शेकापचा लाल बावटा फडकला असून बोरावळेसह माटवणमध्ये सरपंचपदी शेकापचे उमेदवार निवडून आले आहेत, तर सवादमध्ये शिवसेनेने वर्चस्व राखले आहे.
चरई, देवळे ग्रामपंचायत बिनविरोध करून शिवसेनेकडे ठेवण्यात यश मिळवले आहे. देवळे ग्रामपंचायत सरपंचपदी बबिता दळवी, तर चरई सरपंचपदी अनिता अनिल साळवी या बिनविरोध निवडून आल्या आहेत. निकाल लागताच मुंबई-गोवा महामार्गासह महाबळेश्वर मार्गावर शेकापचा लाल बावटा फडकत असल्याचे दिसून आले.

पनवेलमध्ये मतदार स्थानिक आघाड्यांच्या पाठीशी राहिले
पनवेलमधील १० ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक चार ग्रामपंचायती स्थानिक आघाडीने काबीज केल्या तर तीन ग्रामपंचायतीत भाजपा, दोनमध्ये शेकाप तर एका ग्रामपंचायतीत शिवसेनेला यश मिळाले आहे. उरणमध्ये ४ ग्रामपंचायतींपैकी सेना एक, आघाडी दोन तर एक ग्रामपंचायत रिक्त राहिली आहे.
महाड, पोलादपूरमध्ये शिवसेनेची बाजी
महाडमध्ये १३ पैकी सेना व आघाडीला प्रत्येकी पाच तर काँग्रेसला तीन ग्रामपंचायतीत यश आले आहे. पोलादपूरमध्ये ५ पैकी शिवसेनेला ३ तर शेकापला २ ग्रामपंचायती प्राप्त झाल्या.

सुधागडमध्ये शेकापची बाजी
राबगाव/पाली : सुधागड तालुक्यात बुधवारी पाली, वाघोशी, उद्धर, कुंभारशेत नागशेत, नेणवली, चिखलगाव या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यामध्ये नागशेत, नेणवली, चिखलगाव या ग्रामपंचायती सरपंचासह बिनविरोध झाल्या तर उर्वरित चार ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीच्या लढती झाल्या. यामध्ये शेकापने बाजी मारीत सातपैकी तीन ग्रामपंचायतींवर लाल बावटा फडकवला आहे. तर शिवसेनेने दोन ग्रामपंचायतीवर शिक्कामोर्तब केले असून एका ग्रामपंचायतीवर अपक्ष राज आले आहे तर एका ग्रा.पं. वर शेकाप-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली आहे.पाली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर सर्वपक्षीयांनी बहिष्कार टाकला असताना मात्र पाली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवारांमध्ये लढत झाली. शेतकरी कामगार पक्षाने उद्धर, नेणवली, नागशेत या ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले. शेकाप-राष्ट्रवादी आघाडी वाघोशी तर शिवसेनेने कुंभाशेत, चिखलगाव आणि अपक्ष उमेदवारांनी पाली ग्रामपंचायतीवर विजय मिळवला.

पेणमध्ये सर्वपक्षीय निकाल
पेण : पेणमधील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात प्रत्येक राजकीय पक्षाने आपआपल्या ताब्यातील ग्रामपंचायतीचे वर्चस्व ठेवले. गागोदेवर काँग्रेसचा झेंडा, वरेडीवर शेकापचा लालबावटा, कासूवर शिवसेनेचा भगवा तर कुहीटे ग्रामपंचायतीवर राष्टÑवादी काँग्रेसचा झेंडा फडकल्याने राजकीय पक्षाकडून आपआपले सरपंच निवडून आल्याने निकाल समाधानकारक असाच लागला. गागोदेमध्ये मतदारांनी निकीता शिवाजी पाटील यांना विजयी केले. पेणमधील सहा ग्रा.पं. करिता निवडणूक झाली तर जावळी, करंबेळी, निधवली, बेणसे येथील सरपंच बिनविरोध निवडले. उर्वरित चार ग्रा.पं. सरपंचाची थेट निवडणूक झाली.
शेकापने वरेडी ग्रा.पं.मध्ये सरपंचपदाच्या उमेदवार सुरेखा पाटील या विजयी झाल्या. कुहीरे ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या राष्टÑवादी काँग्रेसच्या प्रज्ञा वैभव जवके विजयी झाल्या, कासू ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सरपंच पदाचे उमेदवार आकाश भगवान नाईक हे विजयी झाले आहेत. शेकापने वरेडी, जावळी, बेणसे, कटंवेळी, या चार ग्रा.पं. सरपंचपदावर मोहोर उमटवून आघाडी घेतली. त्या खालोखाल शिवसेना, काँगे्रस, राष्ट्रवादीने प्रत्येकी एक याप्रमाणे सरपंचपदावर मोहोर उमटविली. झोनिटवाडा व निधपली ग्रा.पं.मध्ये सरपंचपद रिक्त राहिले आहे.

Web Title: NCP has 48 Gram Panchayats in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.