"धाडसत्रांना घाबरत नाही म्हणून अस्वस्थ होऊन काहींनी पवारांच्या घरावर दगडफेकीचा हल्ला घडवला"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 03:56 PM2022-04-11T15:56:23+5:302022-04-11T15:58:05+5:30
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा आरोप
"मविआचे निवडून आलेले आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र ते शक्य झाले नाही. म्हणून ईडी (ED), इन्कम टॅक्सची (Income Tax) धाड टाकली जात आहे. ईडी काय महाराष्ट्रातच आहे का ? भाजपचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का?," असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. सोमवारपासून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघातून झाली.
"धाडसत्रांना घाबरत नाही म्हणून काही लोक आणखी अस्वस्थ झाले आणि त्यांनी शरद पवार घरावर दगडफेकीचा हल्ला घडवून आणला. शरद पवार हे नेहमीच एसटी कामगारांसाठी लढले, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले मात्र काहींनी एसटी कामगारांना भडकावण्याचा प्रयत्न केला. आझाद मैदानात चिथावणीखोर भाषणे दिली. त्यातून हे घडले," असेही जयंत पाटील म्हणाले. आता सध्या अटक झालेल्या लोकांची चौकशी सुरू आहे. दुध का दुध पानी का पानी होणारच पण यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
"संघर्षानंतर विजय आपलाच"
"फुले - शाहू - आंबेडकर यांच्या विचारांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालतो. जातीयवादी पक्षांना राष्ट्रवादीच उत्तर देऊ शकते हे लोकांना आता पटले आहे. Everyday is Chance to get better त्यामुळे निराश व्हायचं नाही, संघर्ष असतोच मात्र त्या संघर्षानंतर विजय आपलाच असतो. म्हणून खचून जाऊ नका," असा धीरही जयंत पाटील यांनी दिला.
"...आणि १०० आमदार आले"
२०१९ साली विधानसभा निवडणुकीचा काळ होता, सर्व नेते सोडून जात होते. पक्ष काही टिकणार नाही, १०-१५ आमदार निवडून येतील असे भाकित केले गेले मात्र आपले नेते पवारसाहेब बाहेर पडले आणि काँग्रेस व राष्ट्रवादीने १०० आमदार निवडून आणल्याचंही पाटील यांनी नमूद केलं.