राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक
By admin | Published: July 13, 2016 02:04 AM2016-07-13T02:04:09+5:302016-07-13T02:04:09+5:30
दोन गटांत ठेकेदारी घेण्यावरून झालेल्या वादात रिव्हॉल्वरचा धाक दाखवत हनिफ दुदुके व अन्य व्यक्तींना मारहाण करूनखोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गेली साडेतीन
खालापूर : दोन गटांत ठेकेदारी घेण्यावरून झालेल्या वादात रिव्हॉल्वरचा धाक दाखवत हनिफ दुदुके व अन्य व्यक्तींना मारहाण करूनखोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गेली साडेतीन महिने फरार असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी गजाआड केले आहे.
२९ मार्च २०१६ रोजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत पाली फाटा येथे सुरू असलेल्या साइटवर ठेका घेण्यावरून राष्ट्रवादीचा नेता मुख्त्यार धनसे व त्याच्या साथीदारांनी राडा केला होता. मुख्त्यार धनसे हा त्याच्या कारमधून कामाच्या ठिकाणी आला. त्याच्यासोबत आणखी एक कार, एक क्वॉलिस व १० दुचाकींवर काही तरुण आले. मटेरिअल सप्लायचा ठेका मला दे, दोन्ही कामे मीच करणार, असे म्हणून मुख्त्यार धनसे याने हनिफ यास दमदाटी करण्यास सुरुवात केली. विरोध केल्यानंतर त्याने व त्याच्या साथीदाराने मारहाण केल्याची तक्र ार हनिफ दुदुके यांनी पोलीस ठाण्यात केली होती. तक्र ार दाखल झाल्यानंतर मुख्त्यार धनसे फरार होता.
दरम्यान त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने ७ एप्रिल रोजी फेटाळला होता. त्यामुळे धनसे याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयानेही ७ जुलै रोजी त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर सोमवारी रात्री खोपोली पोलिसांनी मुख्त्यार धनसे याला अटक केली आहे. यातील नियाज इस्माइल खोत व तौफिक निजद कर्जीकर यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, अजिज धनसे फरार आहे. मनोहर बैसाने, मुदस्सर कर्जीकर, नुजफर कर्जीकर, संदीप बोर्ले व सागर पवार या आरोपींना जामीन झाला आहे. या राड्यानंतर खालापूरमध्ये खळबळ उडाली होती. फिर्यादी हनिफ दुदुके शेकापक्षाचे कार्यकर्ते असून, आ. जयंत पाटील यांनी या प्रकरणी उन्हाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. (वार्ताहर)