रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्य़ाशिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे झाल्यामुळे सोहळा आयोजित केला होता. यामध्ये स्थानिक खासदार म्हणून बोलू दिले नाही, या कारणावरून राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी कार्यक्रम संपताच तातडीने तिथून निघून जाणे पसंद केले.
हा कार्यक्रम राजकीय होता. राजशिष्टाचाराचे पालन केले गेले नाही. मला ते बोलू देतील असे वाटले होते. मी पालकमंत्र्यांना याबाबत सुरुवातीला म्हटले होते. कदाचित ते देखील हतबल असतील असे वाटते. आयोजनात अनेक त्रुटी राहिल्या. शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केला गेला याचे समाधान असल्याचे तटकरे यांनी म्हटले.
यावर राज्यातील मंत्री दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेकाचा सोहळा आहे, त्यात कोणी मानापमानाने येऊ नये. तटकरे हे ज्येष्ठ नेते आहेत. पवारांनी त्यांना थोडे मार्गदर्शन करावे असे मला वाटते. हा सोहळा राजकीय नव्हता, असे दीपक केसरकर म्हणाले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. तिथीनुसार किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.