महायुती तुटल्यानेच राष्ट्रवादीची बाऊंड्री
By Admin | Published: October 27, 2014 12:39 AM2014-10-27T00:39:17+5:302014-10-27T00:39:17+5:30
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती अस्तित्वात नव्हती म्हणूनच ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची लाज राखली गेली व तिचे चार आमदार तरी निवडून आलेत
ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती अस्तित्वात नव्हती म्हणूनच ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची लाज राखली गेली व तिचे चार आमदार तरी निवडून आलेत. अन्यथा तेही आले नसते व मनसे, काँग्रेस, सपाप्रमाणेच राष्ट्रवादीही ठाणे जिल्ह्यातून तडीपार झाली असती.
या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १८ जागांपैकी सात भाजपाला, सहा शिवसेनेला, चार राष्ट्रवादीला आणि एक अपक्षाला अशा जागा प्राप्त झाल्या आहेत. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदासंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड विजयी झाले आहेत. त्यांना ८१९७४ मते मिळालीत. आणि भाजपा व शिवसेना यांच्या उमेदवारांना १३३९१ व सनेच्या उमेदवाराला ३७२५९ अशी मते मिळालीत. हा एकच मतदारासंघ असा आहे की जिथे सेना-भाजपाच्या उमेदवारां पडलेल्या मतदानापेक्षा राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवाराला पडलेली मते दुपटीहून अधिक आहेत.
ऐरोली विधानसभा मतदारसंघात गणेश नाईक यांचे पुत्र संदीप हे निवडणूक लढवित होते. या मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराला ४६४०५ तर सेनेच्या उमेदवाराला ६७७१९ अशी मते पडलीत. तर राष्ट्रवादीच्या संदीप नाईक ७६४४४ अशी मते मिळालीत. सेना, भाजपाच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज केली तर ती संदीप नाईक यांच्या मतांपेक्षा दुपटीहून अधिक होते. असेच शहापुरात घडले तिथे राष्ट्रवादीच्या पांडुरंग बरोरा यांना ५६८१३ मते पडलीत. पण सेनेच्या उमेदवारला ५१२६९, भाजपाच्या उमेदवाराला १८२४६ मते पडलीत या दोघांचीही मते बरोरांपेक्षा खूप जास्त होतात. उल्हासनगरातही असेच चित्र आहे. तेथून विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या ज्योती कलानींना ४३७६० मते पडलीत. परंतु, भाजपाच्या उमेदवाराला ४१८९७ सेनेच्या उमेदवाराला २३८६८ मते मिळालीत. दोघांच्या मतांची बेरीज ही खूपच अधिक होते. याचा अर्थ या वेळी सेना, भाजपा स्वतंत्र लढले म्हणून ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला किमान चारजागी तरी यश मिळाले, हे स्पष्ट होते. (विशेष प्रतिनिधी)