कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक सरपंच विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 03:09 AM2018-09-28T03:09:03+5:302018-09-28T03:09:09+5:30
विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पहिल्या गेलेल्या कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची पीछेहाट झाली असून राष्ट्रवादीला देखील मतदारांनी सूचक इशारा दिला आहे.
नेरळ - विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पहिल्या गेलेल्या कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची पीछेहाट झाली असून राष्ट्रवादीला देखील मतदारांनी सूचक इशारा दिला आहे. या निकालात राष्ट्रवादीचे सर्वाधिक सरपंच निवडून आले आहेत.
कर्जत तालुक्यात १३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. १३पैकी कशेळे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्यांची बिनविरोध निवड झाली. याबरोबर बीड बुद्रुक सरपंच देखील बिनविरोध निवडण्यात आला. उर्वरित अकरा ग्रामपंचायतीमध्ये मात्र चुरशीची लढत पहायला मिळाली. प्रतिष्ठेच्या मानिवली ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे तालुका चिटणीस आणि हुतात्मा हिराजी पाटील ग्राम विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रीतम डायरे यांचा ४०० मतांनी पराभव केला. शेलूमध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादी परस्परांना भिडले. या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजी खारीक यांनी रवी मसणे यांचा दणदणीत पराभव केला. यावेळी आसल ग्रामपंचायत राष्ट्रवादीने सेनेकडून हिसकावून घेतली. वारे या ग्रामपंचायतीच्या निकालाकडेही सर्वांचे लक्ष होते. इथे शेकापचे नेते राम राणे यांचे सुपुत्र योगेश राणे यांनी दणदणीत विजय मिळविला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर झालेली त्यांच्या ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. ग्रामपंचायतीमध्ये अवघ्या १५ मतांनी शिवसेनेच्या कल्याणी कराळे या विजयी झाल्या. त्यांना १०४९ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी अश्विनी कराळे यांना १०३४ मते मिळाली.
१३ पैकी सात ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचे सरपंच निवडून आले आहेत. यापैकी दोन जणांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेचे दोन सरपंच विजयी झाले आहेत तर काँग्रेसचा एक सरपंच विजयी झाला आहे. देशात, राज्यात सत्ता असलेल्या भाजपाची मात्र पाटी कोरी राहिली आहे.
रोह्यात राष्ट्रवादीचेच वर्चस्व
रोहा : रोहा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींपैकी २१ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व राखले. दुसरीकडे शेकापच्या हातून पारंपरिक धोंडखार, आरेबुद्रुक ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्याने शेकापचा धुव्वा उडाला असला तरी अनेक ग्रामपंचायतींमध्ये शेकापचे सदस्य निवडून आल्याने तालुक्यात शेकापचा शिरकाव झाल्याचे दिसून आले, तर एकमेव धोंडखारमधून भाजपा हद्दपार झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले. वांगणी एकमेव ग्रामपंचायत सेनेकडे राहिली. तरीही सेनेचे भालगावात ४, आंबेवाडी २, कुडली ६, पिंगळसई२ सदस्य निवडून आल्याने सेनेची कामगिरीही दखलपात्र ठरली आहे.
आधीच राष्ट्रवादीने कडसुरे, कोलाड, चिंचवलीतर्फे अतोणे बिनविरोध करीत सलामी दिली. ग्रामपंचायत ग्रामस्थांनी कडसुरेत राजेंद्र शिंदे, कोलाडात शर्मिला सांगवेकर, चिंचवलीतर्फे अतोणे मंजुळा काटकर यांना बिनविरोध सरपंच केले. त्यानंतर राष्ट्रवादी खारगाव, वरसगाव, आंबेवाडी, वाली, भालगाव, पिंगळसई, देवकान्हे, मढालीखुर्द, मेढा, भिसे, जामगाव, कुडली ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखेल हे अंदाज निकालाने खरे ठरविले. त्यापलीकडे जाऊन राष्ट्रवादीने शेकापच्या ताब्यातील आरेबुद्रुक, धोंडखार ग्रामपंचायती ताब्यात घेऊन विजयाचा नवा इतिहास रचला. राष्ट्रवादीत तीन गट पडले होते. खारगाव, पिंगळसई राष्ट्रवादीत बंडखोरी झाली. तर देवकान्हे, वाली, वरसगाव, भालगावात अवधूत तटकरे राष्ट्रवादीने सुनील तटकरे राष्ट्रवादीला पुन्हा एकदा शह देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
वांगणीच्या सरपंचपदी सेनेच्या पूनम भोसले
नागोठणे : वांगणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना - मनसे आघाडीने राष्ट्रवादी - शेकाप आघाडीचा पराभव करीत सत्ता संपादन केली. सरपंचपदी शिवसेनेच्या पूनम भोसले यांनी शेकापचे एकनाथ ठाकूर यांचा पराभव करीत यश मिळविले. इतर नऊ जागांसाठी झालेल्या मतदानात मनसेने चार जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केले.
सावलीत शेकापचा पराभव
आगरदांडा : सावली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्यांना पराभव पत्करावा लागला, तर समाजसेविका मंदा ठाकूर यांच्या अपक्ष पॅनलने विजय प्राप्त केला आहे. सावली ग्रामपंचायत हद्दीत पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी व सावली ग्रामपंचायतीमधील सर्व गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी सर्वसामान्य महिलेने उपोषण करून गावाला पाणी मिळवून दिले होते. त्यांच्या उपोषणाची दखल येथील ग्रामस्थांनी घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली सावली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अपक्ष स्वतंत्र पॅनल उभे केले होते. येथे थेट सरपंचपद हे अनुसूची जमातीसाठी राखीव होते. परंतु येथे या प्रवर्गाचा उमेदवार न मिळाल्याने सदरची जागा रिक्त राहिली आहे. ९ ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या या ग्रामपंचायतीमध्ये सहा सदस्य हे मोठ्या फरकाने विजयी होऊन मंदा ठाकूर यांच्या पॅनेलचे वर्चस्व राहिले आहे. एक सदस्य राष्ट्रवादीचा तर दोन सदस्य शेतकरी कामगार पक्षाचे निवडून आलेले आहेत.
पिगोंडे ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात
नागोठणे : पिगोंडे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस - शेकाप आघाडीने सत्ता हस्तगत केली. सरपंचपदी राष्ट्रवादीचे संतोष कोळी यांनी सेनेचे विद्यमान ग्रा. पं. सदस्य गंगाराम मिणमिणे यांचा ४३२ मतांनी पराभव करीत यश मिळविले. इतर नऊ जागांसाठी झालेल्या मतदानात राष्ट्रवादी - शेकाप आघाडीने सर्व जागा जिंकत सेना - काँग्रेसच्या ताब्यात असलेली सत्ता आपल्याकडे खेचून आणली. या ग्रामपंचायत हद्दीत असणारी आंबेघर आणि वेलशेत ही दोन्ही गावे आयपीसीएल प्रकल्पग्रस्त गावे असून रिलायन्स कारखान्यामुळे ग्रामपंचायतीला आर्थिकदृष्ट्या एक विशेष महत्त्व आहे.
म्हसळा तालुक्यातील काँग्रेसची आघाडी
म्हसळा : म्हसळेतील ५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस(आय)-सेना युतीने एकमेव आंबेत ग्रामपंचायत, राष्ट्रवादी काँग्रेसने खारगाव (खु.), मेंदडी व मांदाटणे या तीन ग्रामपंचायत आणि कोळे येथे परिवर्तन आघाडीने (शिवसेना पुरस्कृत) सरपंच निवडून आणले आहेत.
माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांच्या आंबेत ग्रामपंचायतीत काँग्रेसने शिवसेनेचा हात हातात घेत राष्ट्रवादीचा पराभव केला. येथे काँग्रेसच्या अफरोजा नाजीम डावरे या निवडून आल्या. ९ सदस्य संख्येपैकी शिवसेना ५, काँग्रेस (आय) ३ व राष्ट्रवादी काँग्रेस १ असे बलाबल आहे.
उरणमध्ये तीन ग्रामपंचायतींत संमिश्र निकाल
उरण : उरणमध्ये चार ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून विंधणे ग्रामपंचायतीत शेकाप-काँग्रेस आघाडीचे तर कोप्रोलीत सेना तर हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवार सरपंचपदी विजयी झाले आहेत. मोठी जुई सरपंच पदासाठी आरक्षण पदाचा उमेदवार नसल्याने अर्ज भरण्यात आले नव्हते.
आज मोठी जुई, कोप्रोली, हनुमान कोळीवाडा व विंधणे आदी चार ग्रामपंचायतींंचा निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. मोठी जुई येथे सरपंचपदासाठी आरक्षण पडल्याने उमेदवारी अर्ज भरण्यात आला नव्हता. याठिकाणी शेकापला १ तर काँग्रेस आघाडीला ११ जागा मिळाल्या.
विंधणेमध्ये सरपंचपदी शेकापच्या निसर्गा रोशन डाकी निवडून आल्या तर शेकाप-काँग्रेस आघाडी ८, भाजपा - १ , शिवसेना २, राष्ट्रवादीला १ जागा मिळाली.
कोप्रोली ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या अलका सतीश म्हात्रे सरपंचपदी निवडून आल्या आहेत, तर शेकाप-कॉग्रेस आघाडी ४, शिवसेना ४, भाजपा २, अपक्ष १ निवडून आले आहेत.
पनवेलमध्ये ५ ग्रामपंचायतींत शेकाप, ३ मध्ये भाजपाचे सरपंच
पनवेल : पनवेल तालुक्यात पाच ग्रामपंचायतीवर शेकापचे सरपंचपदाचे उमेदवार निवडून आले, तर तीन ठिकाणी भाजपाला विजयश्री प्राप्त झाली. सेनेला एका ठिकाणी सरपंचपद प्राप्त झाले आहे.
पनवेल तालुक्यात पळस्पे, देवद, नांदगाव, पोयंजे, वांगणी, पारगाव, गव्हाण व वहाळ या ग्रामपंचायतीत या निवडणुका पार पडल्या. गव्हाण व वहाळ याठिकाणी शेकाप,भाजपा, काँग्रेस यांची अनोखी युती चर्चेचा विषय ठरला आहे. आदई आणि विचुंबे याठिकाणच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. ग्रामीण भाग हा शेकापचा गड मानला जातो. मात्र दहा पैकी चार ठिकाणी भाजपाने खाते उघडल्याने भाजपाची ताकद ग्रामीण भागात वाढत असल्याचे दिसून येत आहे.
पोयंजे ग्रामपंचायीत थेट सरपंचपदी सेनेच्या उमेदवाराची वर्णी लागली आहे . उर्वरित वहाळ, पारगाव, देवद, आदई, विचुंबे याठिकाणी शेकापचे सरपंच निवडून आले. तर नांदगाव, पळस्पे, गव्हाण, वांगणी तर्फे वाजे याठिकाणी भाजपाचा सरपंच निवडून आले. पनवेल तालुक्यात शेकाप व भाजपा कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाते. मात्र काही ठिकाणी गावपातळीवर आघाडी स्थापन करून सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते. पनवेल तालुक्यात नेहमीप्रमाणे होणारा पक्षीय संघर्ष यावेळी पाहावयास मिळाला नाही.