राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निर्णय नाही, सुनील तटकरे यांनी घेतली माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 05:36 AM2018-10-07T05:36:53+5:302018-10-07T05:37:17+5:30

२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील पक्ष कार्यालयात सकाळी बैठक पार पडली. जिल्हानिहाय सर्व जागांचा आढावा घेण्यात येणार आहे.

 NCP's not a decision, Sunil Tatkare withdrew the call | राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निर्णय नाही, सुनील तटकरे यांनी घेतली माघार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निर्णय नाही, सुनील तटकरे यांनी घेतली माघार

googlenewsNext

अलिबाग : रायगड लोकसभेच्या उमेदवारीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुनील तटकरे यांनी माघार घेतली आहे. रत्नागिरीमधील त्यांचे कट्टर विरोधक माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनीही रायगड लोकसभेची जागा लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये कोणताही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे रायगड लोकसभा मतदार संघाचा किल्ला कोण लढवणार हे स्पष्ट झाले नाही. तटकरे यांनी माघार घेतल्याने रायगडमधली त्यांच्या समर्थकांमध्ये मात्र प्रचंड नाराजी आहे.
२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील पक्ष कार्यालयात सकाळी बैठक पार पडली. जिल्हानिहाय सर्व जागांचा आढावा घेण्यात येणार आहे. शनिवारच्या बैठकीमध्ये १७ जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. सुरुवातच लोकसभेच्या उमेदवारीवरून झाली.
बैठकीमध्ये तटकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, असा त्यांच्या समर्थकांचा विश्वास होता. २०१४ साली सुनील तटकरे यांनी ही जागा शिवसेनेचे खासदार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या विरोधात लढवली होती. त्यामध्ये तटकरे यांचा अवघ्या दोन हजार ११० मतांनी पराभव झाला होता.
तटकरे यांना त्या वेळी शेकापने कडाडून विरोध केला होता. चिपळूण विधानसभेची जागा २००४ आणि २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढलेले रमेश कदम यांना शेकापने उमेदवारी देऊन तटकरे यांच्या समोर कडवे आव्हान उभे केले होते.
शनिवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये रायगड लाकसभेच्या जागेबाबतचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्या वेळी भास्कर जाधव हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी जाधव यांनी सांगितले. त्यानंतर चिपळूणमधील पदाधिकाऱ्यांना विचारण्यात आले असता त्यांनी स्पष्ट भूमिका न घेता पक्ष जो उमेदवार देईल, त्याचे काम करण्यात येईल, असे सांगितले.
त्यानंतर सुनील तटकरे यांनी निवडणूक लढणार नसल्याचे बैठकीमध्ये स्पष्ट केले. त्यावर शरद पवार यांनी उमेदवार जाहीर केला नसल्याचे सांगितले; परंतु संतप्त झालेल्या तटकरे यांनी मी निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही. पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम माझे कार्यकर्ते मनापासून करतील, असे ठणकावून सांगितले. त्यानंतर मावळ लोकसभेच्या जागेबाबत बैठक सुरू झाली.

बैठकीत ठामपणे मागणी नाहीच
सुनील तटकरे हे २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार नव्हते, केवळ पक्षाचा आदेश असल्याने ते शिवधनुष्य त्यांनी उचलेले होते. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला; परंतु त्यांनी गीते यांना कडवी झुंज दिली होती, हे लपलेले नाही.
२०१४ चा वचपा काढण्यासाठी तटकरे यांना २०१९ साली पुन्हा संधी दिली जाईल, असा पुरा विश्वास होता. मात्र, भास्कर जाधव यांच्या नावाने माशी शिंकल्याची तटकरे समर्थकांची धारणा झाली.
राष्टवादी काँग्रेसचे अली कौचाली वगळता तटकरे यांनाच रायगड लोकसभेची जागा द्यावी, अशी ठामपणे मागणी बैठकीमध्ये कोणी केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
वास्तविक पाहता सुनील तटकरे यांनाच उमेदवारी देणे गरजेचे आहे. २०१४ सालच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी पक्षाने दिली पाहिजे.
याआधीच्या निवडणुकीत अनंत गीते हे एक लाख मताधिक्क घेऊन निवडून येत होते. मात्र, तटकरे यांनी त्यांना फक्त दोन हजार मतांवरच विजय मानण्यास भाग पाडले होते.
सुनील तटकरेच त्यांना कडवे आव्हान देऊ शकतात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज धुमाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title:  NCP's not a decision, Sunil Tatkare withdrew the call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड