श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीची सरशीलोकमत न्यूज नेटवर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 07:06 AM2017-10-18T07:06:17+5:302017-10-18T07:06:21+5:30
श्रीवर्धन तालुक्यामध्ये दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये १४ ग्रामपंचायतींपैकी ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या
श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यामध्ये दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये १४ ग्रामपंचायतींपैकी ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या, तर सोमवारी घेण्यात आलेल्या ७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये शेखाडी ग्रा.पं.चा अनुसूचित जमातीचा उमेदवारामुळे सरपंचपद रिक्त तर कुडगाव येथे गावाने नेमून दिलेला सरपंच बिनविरोध करण्यात आला.
५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या निवडणुकीपैकी दिवेआगर, वाळवटी, रानवली, सायगाव या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने यश मिळविले, तर शिवसेनेने साखरेणे या ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकविला. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आदर्श सांसद ग्राम योजनेतून दत्तक घेतलेल्या दिवेआगर ग्रामपंचायतीवर ११ पैकी १० जागांवर यश मिळविता आले, तेथील शिवसेनेला एकच जागा जिंकता आली.
साखरोणे ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये जागृती चालके २३० मते (शिवसेना) विजयी झाले. त्याचप्रमाणे वाळवटी ग्रामपंचायत रजिवाना घरटकर ६५४ मते (राष्ट्रवादी) विजयी, सायगाव ग्रामपंचायत लीलाधर रिकामे ४५८ मते ( शेकाप राष्ट्रवादी आघाडी ) विजयी, रानवली ग्रामपंचायत सेजल गजमल २५९ मते (राष्ट्रवादी) विजयी, दिवेआगर ग्रामपंचायत उदय बापट ९२२ मते (राष्ट्रवादी) विजयी झाले. कुडगाव ग्रामपंचायतीसाठी गावाने नेमून दिलेल्या प्रमिला विनोद मेंदाडकर यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. तर वाळवटी शेखाडी ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जमाती आरक्षण असल्याने व येथे सरपंचपदासाठी सदर प्रवर्गाचा उमेदवार उपलब्ध न झाल्याने हे पद रिक्त राहणार आहे तर यापूर्वी ७ ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये सर्वे, कुडकी, वांजळे, चिखलप, जसवली, मेघरे, गुळधे चा समावेश आहे.
दिवेआगर ग्रामपंचायतीच्या एकूण ११ सदस्यपदाच्या जागांपैकी १० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत तर शिवसेना पक्षाची यामध्ये मोठी पिछेहाट झाली असून त्यांना फक्त एकाच जागेवर यश मिळविता आले. दिवेआगरप्रमाणे रानवली ग्रामपंचायत देखील तालुक्यातील निकालाच्या दृष्टीने महत्त्वाची ग्रामपंचायत होती, यामध्ये सरपंच पदासाठी चुरशीची लढाई होती. यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शेजल शैलेंद्र जाधव यांनी बाजी मारली.