खोपोलीत वीज वितरणवर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:15 PM2018-10-13T23:15:03+5:302018-10-13T23:15:27+5:30
वाढीव वीज बिले, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, भारनियमनाचे सुरू होणारे संकट या मुद्द्यांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढण्यात आला होता.
खोपोली : वाढीव वीज बिले, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, भारनियमनाचे सुरू होणारे संकट या मुद्द्यांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढण्यात आला होता.
मोर्चात युवक अध्यक्ष अतुल पाटील, नगराध्यक्षा सुमन औसरमल, राष्ट्रवादी खोपोली शहराध्यक्ष मनेष यादव, नगरसेवक मोहन औसरमल, नगरसेवक मंगेश दळवी आदीसह खोपोली शहरातील युवक, वीजग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी महावितरण कंपनीचे सहायक अभियंता बालाजी छात्रे यांना घेराव घालून खोपोलीच्या नगराध्यक्षा व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी वाढीव विजेचे दर त्वरित रद्द करणे, वीजग्राहकांना चुकीचे रीडिंग, खराब मीटर, वाढीव स्वरूपात विजेची बिले, जलदगतीचे वीज मीटर, वीजबिलातील त्रुटींबाबत जाब विचारला.
तसेच वीज वापर नसतानाही वाढीव बिले येणे, विजेचा मीटर बंद असल्याची लेखी तक्रार करूनही अनेक महिने त्याची दखल न घेणे, अशा अनेक समस्यांना वीजग्राहकांना सामोरे जावे लागत असताना, वीज वितरणाच्या अधिकारी व कर्मचाºयांचा बेजाबदारपणा व कामचुकारपणा आणि शहरातील सर्वसामान्य ग्राहकांना भेडसावत असलेल्या समस्यांसंदर्भात फैलावर घेतले.
महावितरण कर्मचाऱ्यांचा अनागोंदी कारभार चालू असून, त्यावर अधिकारी व अभियंता यांचे नियंत्रण नाही, कर्मचारी जाणीवपूर्वक बेजबाबदार व कामचुकारपणा करत आहेत. जनतेची कामे होणार नसतील तर खुर्ची खाली करा, असे नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी ठणकावून सांगितले. महावितरणकडून नगरपरिषद हद्दीतील होणाऱया कामाबद्दल कोणत्याही पूर्वसूचना देण्यात येत नाहीत, बिले मागायला मात्र वेळेवर येता, असा आरोप नगरसेवक मोहन औसरमल यांनी करीत, महावितरण कार्यालयात आजतागायत ग्राहकांच्या तक्रारीची नोंदवही नाही, अधिकारीच जर बेजबाबदारपणे वागत असतील, तर कर्मचाऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही, यापुढे ग्राहकांच्या तक्रारींचे एका फेरीत निरसन झाले पाहिजे, अशी सूचना केली. आंदोलनकर्त्यांच्या तक्रारी ऐकून घेत, ग्राहक-अधिकारी यांच्यात समन्वय साधण्यासाठी लवकरच मेळावा आयोजित करून काही समस्या असतील, तर तिथेच सोडविण्याचे आश्वासन अभियंता बालाजी छात्रे यांनी दिले आहे.