राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांचे चार उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:37 AM2019-03-30T01:37:51+5:302019-03-30T01:38:12+5:30
रायगड लोकसभा मतदारसंघातील एका जागेसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दोन उमेदवारांनी एकूण पाच उमेदवारी अर्ज दाखल के लेआहेत.
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील एका जागेसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दोन उमेदवारांनी एकूण पाच उमेदवारी अर्ज दाखल के लेआहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांचे चार तर अदिती सुनील तटकरे यांच्या एका अर्जाचा समावेश असल्याची माहिती रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
अलिबागच्या जेएसएम कॉलेजमधून पुणे विद्यापीठाची पी.डी. सायन्स पदवी संपादन केलेल्या तटकरे यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा कोणताही गुन्हा दाखल नाही. तसेच कोणत्याही न्यायालयात कोणत्याही स्वरूपाचा खटला दाखल नसल्याचे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज सादर करताना तटकरे यांनी दिलेल्या शपथपत्रात आपली एकूण बँक खात्यातील जमा, रोख रक्कम व दागदागिने ही संपत्ती ३ कोटी ९१ लाख ०७ हजार ५७३ रुपये असल्याचे जाहीर केले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शपथपत्रात दाखल केलेल्या बँक खात्यातील जमा, रोख रक्कम व दागदागिने संपत्तीमध्ये १ कोटी ३१ लाख ०६ हजार १९८ रुपयांनी वृद्धी झाल्याचे दिसून आले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेली त्यांची ही संपत्ती २ कोटी ६० लाख ०१ हजार ३७५ रुपये होती. त्यांच्या पत्नी वरदा सुनील तटकरे यांच्या नावे सद्य:स्थितीत असणारी बँक बॅलन्स, रोकड व दागदागिने ही संपत्ती ६४ लाख ०४ हजार ७०४ रुपये नमूद करण्यात आली आहे. २०१४ च्या तुलनेत या संपत्तीत १० लाख २७ हजार २२४ रुपयांची घट दिसून येत आहे. २०१४ मध्ये ही संपत्ती ७३ लाख ३१ हजार ९२८ रुपये होती.
प्रतिज्ञापत्रात नमूद तटकरे यांची स्थावर मालमत्ता ४ कोटी ३० लाख २३ हजार ९३० रुपये असून २०१४ च्या तुलनेत त्यात ४५ लाख २७ हजार ०९७ रुपयांनी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये ही संपत्ती ३ कोटी ८४ लाख ९६ हजार ८३३ रुपये होती.
पत्नी वरदा तटकरे यांची स्थावर संपत्ती ३ कोटी ८९ लाख ५१ हजार ७० रुपये असून त्यामध्ये २०१४ च्या तुलनेत १ कोटी १ लाख ३८ हजार ७० रुपयांची वाढ झाली आहे. २०१४ मध्ये त्यांची ही संपत्ती २ कोटी ८८ लाख १३ हजार रुपये होती.