आगरदांडा : जीवनावश्यक वस्तंूचे गगनाला भिडलेले भाव, वाढती महागाई याविरोधात गुरु वारी मुरुड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने थाळीनाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी केले.मोदी सरकार हाय हाय, देवेंद्रजी फडणवीस हाय हाय, जनतेची दिशाभूल करणारे व खोटारडे सरकार हाय हाय असा हल्लाबोल करत आझाद चौक ते तहसीलदारपर्यंत आंदोलन करण्यात आले. यावेळी मुरुडचे तहसीलदार संदीप पानमंद यांना तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी निवेदन दिले. केंद्रात भाजप सरकार येवून दीड वर्ष पूर्ण झाले. मात्र या संवेदनहीन सरकारमुळे दुष्काळग्रस्त शेतकरी आत्महत्या करतात. मोदी सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासून प्रत्येक वस्तूमध्ये दर वाढत गेले. २०१४ ला तूरडाळ ७३ रुपये किलो होती. आज ती तूरडाळ २०० रुपये किलो, कांद्याचे भाव २०१४ मध्ये २० रु.किलो होते. आज ८० रुपये किलो अशा अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहेत, असे प्रतिपादन मंगेश दांडेकर यांनी यावेळी केले आहे. यावेळी नगरसेवक अविनाश दांडेकर, नगरसेवक नितीन पवार, समाजसेवक कृष्णा म्हात्रे, स्मिता खेडेकर, अतिक खतीब, शहर अध्यक्ष हसमुख जैन, विजय पैर, उपनगराध्यक्ष रहिम कबले, नगरसेवक प्रमिला माळी, नगरसेवक संजय गुंजाळ आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
युती सरकारविरोधात राष्ट्रवादीचे थाळीनाद आंदोलन
By admin | Published: October 29, 2015 11:38 PM