नेरळ : नेरळ-माथेरान घाटरस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने तयार केला असून, घाटात दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळत असतात. त्या दरडींना रोखण्यासाठी शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून लोखंडी जाळ्या आणि नेट बसविण्यात यावेत, अशी मागणी माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री यांच्याकडे केली आहे.
माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी नेरळ-माथेरान-नेरळ ही मिनीट्रेन वगळता नेरळ-माथेरान घाटमार्ग सोडला, तर अन्य कोणताही मार्ग नाही. त्यामुळे पावसाळ्यात बंद असलेल्या मिनीट्रेननंतर नेरळ-माथेरान घाटरस्ता दरडी कोसळून बंद पडण्याच्या घटना घडत असतात. नुकतेच नेरळ-माथेरान या सात किलोमीटर लांबीच्या घाटरस्त्याचे मजबुतीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी केले आहे. मात्र, या घाटरस्त्यात काही धोकादायक वळणे असून त्या ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानी टाळण्यासाठी नेट बसविणे गरजेचे आहे.
जून २०१६ मध्ये या घाटरस्त्यातून प्रवास करत असताना माथेरान येथील नागरिकाला गंभीर दुखापत झाली होती. तर २०१७ रोजीही अनेक वेळा दरड कोसळण्याचे प्रकार घडले आणि परिणामी घाटरस्ता काही काळाकरिता बंद होता. २०१८ मध्येदेखील या घाटात अनेक ठिकाणी छोटे-मोठे दगड आणि वृक्ष उन्मळून पडत आहेत. ८ जुलै २०१८ रोजी पहाटे वॉटर पाइप स्थानकाच्या वर मोठी दरड कोसळली आणि पहाटेची वेळ असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही; पण या सर्वांचा विपरित परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला.
माथेरानला मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे या घाटरस्त्यात अनेक धबधबे आहेत. त्यामुळे नेरळ-माथेरान घाटामधील काही भाग हा अत्यंत धोकादायक बनला आहे. विशेष करून चांगभलेचे मंदिर, तेथे असणाºया वळणावर असलेली दरड आणि वॉटरपाइपच्या वर असणारी दरड ही पावसाळ्यात कधीही पडून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. माथेरानचा हा एकमेव घाटरस्ता असल्याने आणि जीवितहानी टाळण्यासाठी यापुढे तरी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाने तातडीने पुढाकार घ्यावा.
नेरळ-माथेरानच्या घाटात धोकादायक ठिकाणी युद्धपातळीवर लोखंडी जाळ्या आणि नेट लावून संभाव्य जीवितहानी टाळावी, अशी मागणी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेटून निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना कराखंडाळा-लोणावळा एक्स्प्रेसवे लगत दरडी कोसळू नयेत, म्हणून नेट बसवून रस्ता संरक्षित करण्यात आला आहे, नेरळ- माथेरान घाटरस्त्यावर नेट बसवणे तसेच इतर तातडीच्या दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे, या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण आपल्या स्तरावरून जलदगतीने संबंधित विभागास वेळीच आदेश द्यावेत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.