कर्जत : देण्याची वृत्ती म्हणजे सेवा करण्याची वृत्ती, हीच वृत्ती आपण अंगी बाणवण्याची गरज आहे. अनुग्रहापासून अनुभवापर्यंतच्या प्रवासात आनंद वाटायचा व आनंद लुटायचा, असे प्रतिपादन अथांग जनसमुदायासमोर प्रल्हाद वामनराव पै यांनी जीवन विद्या ज्ञानपीठ कर्जत येथे केले. निमित्त होते कृतज्ञता दिन सोहळ्याच्या द्वितीय पुष्पाचे.
ज्ञानदान व वैचारिक क्रांतीद्वारे समाजप्रबोधनाचा वसा घेतलेल्या सद्गुरू श्री वामनराव पै यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच जीवन विद्या मिशन आयोजित कृतज्ञता सोहळा किंवा गुरुपौर्णिमा महोत्सव. २१ जुलै ते २६ जुलै दरम्यान या महोत्सवाचे आयोजन जीवन विद्या ज्ञानपीठ कर्जत येथे करण्यात आले आहे. यानिमित्त देश-विदेशातून मोठ्या संख्येने ज्ञानपीठात आलेल्या नामधारकांना सद्गुरूंचे सुपुत्र प्रल्हाद पै मार्गदर्शन करताना म्हणाले, माणूस सर्व मिळवण्याच्या मागे लागल्यामुळे संघर्ष निर्माण होतो व संघर्षातून एकच गोष्ट निर्माण होते ते म्हणजे दु:ख, त्यामुळे आनंद मिळवण्याच्या भानगडीत पडूच नये, देण्याचा विचार करावा. देण्याची इच्छा व्यक्त केली की येण्याची व्यवस्था होतेच. या वेळी ज्येष्ठ प्रबंधक शिवाजी पालव, रत्नागिरी जिल्हा माजी सभापती दत्ता कदम, व्हिनस केकचे सर्वेसर्वा विनायक कारभाटकर, पंचायत समिती सभापती राहुल विशे, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर आदी उपस्थित होते.
२१ जुलै ते २६ जुलै दरम्यान गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन जीवन विद्या ज्ञानपीठ कर्जत येथे करण्यात आले आहे. यासाठी देश-विदेशातून नामधारक उपस्थित आहेत.