कोकणातील वाहून जाणाऱ्या पाण्याच्या योग्य नियोजनाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 01:45 AM2019-08-07T01:45:56+5:302019-08-07T01:46:24+5:30
रायगड जिल्ह्यावर निर्सगाने मुक्त हस्ते पावसाची उधळण केलेली असताना पाणी अडवण्यात मात्र अपयश आल्याचे दिसून येते.
- आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड जिल्ह्यावर निर्सगाने मुक्त हस्ते पावसाची उधळण केलेली असताना पाणी अडवण्यात मात्र अपयश आल्याचे दिसून येते. मोठ्या संख्येने पडणाºया पावसाचे पाणी अडवण्यासाठी नव्याने जिल्ह्यात एकाही धरणाची निर्मिती झालेली नाही. उलट प्रस्तावित असणारी धरणे कागदावरच रखडली आहेत. सरकार, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अपयशामुळेच जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये डिसेंबर अखेरपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात होते. जिल्हा प्रशासनाला टंचाई दूर करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. त्याचप्रमाणे कोट्यवधी रुपये जलयुक्त शिवार योजनेवर खर्च करत आहे.
पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असताना शेतीला पाणी कोठून मिळणार. जिल्ह्यात पुरेशी धरण नसल्याने शेतांमध्येही शेतकऱ्यांना केवळ एकच पीक घ्यावे लागत आहे. पाण्याची व्यवस्था झाल्यास शेतकºयांना दुबार आणि तिबार पीक आपापल्या शेतात घेता येतील आणि शेतकरीही आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल; परंतु कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत कोणीच आवाज उठवत नसल्याचे चित्र आहे. नवीन प्रकल्प उभारण्यासाठी सरकारकडे निधीच शिल्लक नसल्याने जिल्ह्यातील मोठी धरण पूर्ण होताना दिसत नाहीत. रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पाण्याचे योग्य नियोजन होत नाही. प्रशासन, सरकार आणि लोकप्रतिनिधी यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने जिल्ह्यातील सांबरकुंड, सारल घोळ यासह अन्य रखडलेली धरणे पूर्ण झाली पाहिजेत, प्रत्येक तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो त्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक धरण उभारले पाहिजे.
- राजन भगत, श्रमिक मुक्ती दल