सागरीमार्गासाठी ६४६ कोटींची गरज
By admin | Published: October 28, 2015 12:59 AM2015-10-28T00:59:59+5:302015-10-28T00:59:59+5:30
सागरी महामार्गाच्या रायगड जिल्ह्यातील १९५ किमी रस्त्यापैकी १७९ किमी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित १६ किमी रस्ता आणि आवश्यक चार पुलांचे बांधकाम याकरिता
जयंत धुळप, अलिबाग
सागरी महामार्गाच्या रायगड जिल्ह्यातील १९५ किमी रस्त्यापैकी १७९ किमी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित १६ किमी रस्ता आणि आवश्यक चार पुलांचे बांधकाम याकरिता ६४६ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याची माहिती सन २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या कपात सूचनेच्या लेखी उत्तरात राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला दिली असल्याची माहिती अलिबागचे आमदार पंडित पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
हा संपूर्ण सागरी महामार्ग केवळ सागरी महामार्ग नाही, तर तो या देशाच्या सीमेवरील महत्त्वाचा महामार्ग असल्याने तो राष्ट्रीय सीमा महामार्ग या सदरात केंद्र सरकारच्या माध्यमातून होणे अत्यावश्यक असल्याने तशी मागणी आपण राज्य सरकारकडे केली असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. १९९३ मध्ये शेखाडी-श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी आरडीएक्स ही अतिसंहारक स्फोटके बेकायदा उतरवून पुढे ती देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत प्रचंड मोठा संहार घडून आला. त्यानंतरही सागरीमार्गेच अतिरेकी मुंबईत पोहोचले. यातून शहाणपण शिकून कोकण किनारपट्टीतील हा महामार्ग राष्ट्रीय सीमा महामार्ग म्हणूनच केला पाहिजे या मागणीकरिता पाठपुरावा करणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील उरण, पेण, अलिबाग, मुरुड व श्रीवर्धन हे तालुके समुद्र व खाडीलगत आहेत. या तालुक्यातील पर्यटन, शेती व मत्स्य व्यवसाय यांना बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टिकोनातून समुद्रखाडीलगत प्र.रा.मा.क्र. ४ दर्जाच्या सागरी महामार्गाचा वापर होऊ शकतो, हे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले. रायगड जिल्ह्यातील या रस्त्याच्या एकूण १९५ कि.मी. लांबीपैकी १७९ कि.मी. इतक्या लांबीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नव्याने बांधकाम करावयाच्या १६ कि.मी लांबीपैकी १२.५० कि.मी. लांबीच्या रस्त्यास अपेक्षित जमिनीच्या भूसंपादनाची कार्यवाही प्रगतिपथावर असल्याचे सांगितले. या रस्त्याच्या बांधकामासाठी ४६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे नमूद केले.