माथेरानमध्ये वृक्षलागवडीची आवश्यकता; जुनी झाडे उन्मळून पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:04 AM2020-07-25T00:04:39+5:302020-07-25T00:04:50+5:30
नगरपरिषद, वनखाते, संयुक्त वन समितीच्या पुढाकाराची गरज
माथेरान : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात माथेरानमधील असंख्य जुनी झाडे उन्मळून पडली असल्याने, बहुतांश परिसर पूर्णत: उजाड झालेला आहे. यासाठी फळा-फुलांच्या रोपांच्या लागवडीसाठी नगरपरिषद, वनखाते आणि संयुक्त वन समितीच्या पुढाकाराची गरज असल्याची स्थानिकांमधून मागणी केली जात आहे.
माथेरानमध्ये जवळपास दोन हजारांहून अधिक जुनी झाडे मुळासहित उन्मळली असल्याने, अनेक भागाला उजाड स्वरूप प्राप्त झाले आहे. माथेरानची खरी ओळख ही येथील वनसंपदा आहे. याच वनराईच्या गारव्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांना नेहमीच माथेरानचे डोंगर साद घालत असतात.
अतिवृष्टीमुळे येथील मातीची मोठ्या प्रमाणावर धूप होत असते. त्यामुळे झाडे मुळासहित उन्मळून पडण्याची संख्या दरवर्षी पावसाळ्यात वाढत असते. यासाठी माथेरानच्या चारही बाजूंना धूप प्रतिबंधक रोपांच्या लागवडीसाठी नगरपरिषदेने, तसेच निम्म्याहून अधिक भूभाग हा वनखात्याच्या अखत्यारित येत असल्याने, त्यांनी पुढाकार घेऊन वृक्षारोपण मोहीम यशस्वी होण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करणे गरजेचे बनले असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
१६० रोपे पडून
पावसाळ्यात येथे वृक्षारोपण केले जाते, परंतु जुलै महिना संपायला आला, तरीसुद्धा अद्याप याबाबत काहीही ठोस उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नगरपरिषदेने चांगल्या दर्जाची येथील मातीशी अनुरूप रोपे लागवडीसाठी आणल्यास पुन्हा एकदा ही वनराई बहरणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी १६० रोपे नगरपरिषदेने मागविली होती. ती तशीच येथील नौरोजी उद्यानात पडून आहेत. त्यातील बहुतेक रोपे सुकून गेली आहेत. यामुळे नगरपरिषदेच्या पैशांचा एक प्रकारे अपव्यय होत आहे. याकडे मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे असे येथील धनगर समाज अध्यक्ष राकेश कोकळे यांच्यासह नागरिकांची मागणी आहे