मुंबई : पंजाब नॅशनल बँकेचे १३ हजार कोटी रुपये कर्ज बुडवून देशाबाहेर पळालेल्या उद्योजक नीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत आलिशान बंगला पाडण्यात येणार आहे. नीरव मोदीसह मेहुल चोक्सी, स्मिता गोदरेज, मधुकर पारेख आणि इतरांचे अनधिकृत बंगले या भागात आहेत. अनधिकृत बंगल्यांवर कारवाई करण्याचे तसेच नीरव मोदीचा बंगला पाडण्याचे निर्देश रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी स्पष्ट केले.रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील खासगी बेकायदा बंगल्यांवर कारवाई करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले. अनधिकृत बांधकामांवर कायदेशीर कारवाई का केली नाही, असा सवाल १ आॅगस्टला मुंबई उच्च न्यायालयाने रायगड जिल्हाधिकाºयांना केला होता. अलिबागमध्ये नीरव मोदीसह इतरांच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याचे दिसत नाही, अशी नाराजी न्यायालयाने व्यक्त केली होती. न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारने हा विषय गांभीर्याने घेत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.अलिबागमधील किहीम गावात नीरव मोदीचा तर मेहुल चोक्सीचा आवास गावात बंदला आहे. सीआरझेडच्या तरतुदींनुसार नीरव मोदीचा बंगला पाडण्यात येईल, असे अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे. इतर बंगल्यांचे काय होणार, असा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला तेव्हा त्यातल्या काही बंगल्यांची प्रकरणे न्याय प्रविष्ट आहेत, असे उत्तर रामदास कदम यांनी दिले. या सर्व प्रकरणात अलिबागमध्ये ६९ आणि मुरुडमध्ये ९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये नीरव मोदीच्या बंगल्याचाही समावेश आहे. तर अनेक सेलिब्रेटींचेही बंगले या यादीत आहेत. कलम १५ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. यामद्ये १ लाख रुपये दंडापासून ५ वर्षे कैद अशी शिक्षेची तरतूद आहे.
नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला पाडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 3:36 AM