अलिबाग : पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा घोटाळा करून देशाबाहेर पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदीचा अलिबाग येथे ३० एकरात पसरलेला सुमारे १०० कोटींचा आलिशान बंगला ११० डायनामाइट्स लावून उद्ध्वस्त करण्यात आला.मोदीने अलिबाग परिसरात बेकायदा बांधलेला हा आलिशान बंगला पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार, ही कारवाईकरण्यात आली. कोळगाव समुद्रकिनाऱ्यावरील हा बंगला तोडण्याची कारवाई २५ जानेवारीपासून सुरू होती. मात्र, जेसीबीच्या साहाय्याने पाडकाम होऊ न शकल्याने स्फोटकांचा वापर करावा लागला.शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे आणि रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानमधील भिलवाडातील माँ एंटरप्रायझेसचे संचालक धर्मीचंद खिच्ची यांच्या सहकाऱ्यांनी हे पाडकाम केले. त्यासाठी ३० किलो जिलेटिनचा वापर करण्यात आला होता.जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी ‘ब्लास्ट स्विच’ दाबताच स्फोटकांचा मोठा आवाज होऊन हा बंगला जमीनदोस्त झाला. स्फोटामुळे धुळीचे मोठे लोट निर्माण झाले होते. हे पाडकाम पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. उद्ध्वस्त बंगल्याचे ढिगारे हटविण्यासाठी किमान १५ दिवस लागण्याची शक्यता आहे.
नीरव मोदीचा १०० कोटींचा बंगला डायनामाइट्सने २ मिनिटांत उद्ध्वस्त, अलिबागमध्ये कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 6:41 AM