अलिबाग - फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या १०० कोटींच्या बंगल्यामध्ये किमती वस्तूंचा खजिना असल्याने सर्वप्रथम त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यानंतर बंगला स्फोटकांच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात येईल, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिली.पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधी रुपयांचा चुना लावून प्रसिद्ध हिरे व्यापारी फरार झाला आहे. सीबीआय आणि ईडी यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. काहीच दिवसांपूर्वी रायगडचे जिल्हाधिकाऱ्यांनी बंगला पाडण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार बंगला जमीनदोस्त करण्यात येणार आहे. परंतु बंगल्यामध्ये झुंबरे, टाईल्स, विजेचे किमती सामान, बुद्धांची मूर्ती यांसह अन्य किंमती वस्तू आहेत. प्रथम त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. नंतर स्फोटकांच्या साह्याने बंगला जमीनदोस्त करण्यात येणार आहे. जेसीबीच्या सहाय्याने शक्य तेवढे बांधकाम पाडण्यात येत आहे. परंतु बंगल्याचे बांधकाम मजबूत असल्याने जमीनदोस्त करण्यासाठी ब्लास्टिंग करावे लागणार असल्याचे जिल्हाधिकारी सूर्यवंशी म्हणाले.