आविष्कार देसाईअलिबाग : येथील सरकारी रुग्णालयातून अत्यवस्थ असणा-या रुग्णांना आता अत्याधुनिक ‘रुग्णवाहिका सागरी बोटीची’ (बोट अॅम्ब्युलन्स) सुविधा पुरवण्यावर जिल्हा प्रशासन गांभीर्याने विचार करीत आहे. यासाठी तब्बल दोन कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा सरकारी रुग्णालयाने तयार केला आहे. कमी वेळेत मुंबईमधील आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. हीयोजना प्रत्यक्षात सुरू झाल्यास अत्यवस्थ रुग्णांना नवसंजीवनी मिळणार आहे.रायगड जिल्हा हा औद्योगिक तसेच पर्यटनाचा जिल्हा आहे. याच जिल्ह्यातून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, कोकण रेल्वे, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, अलिबाग-वडखळ राष्ट्रीय महामार्ग जातो. त्याचप्रमाणे येऊ घातलेला समृद्धी मार्ग, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर, ट्रान्स हार्बर लिंक अशा विविध मार्गांचा समावेश आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहे, तर काही नजीकच्या कालावधीत सुरू होणार आहेत. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात एमआयडीसी प्रकल्प आहेत. त्याचप्रमाणे नवरतन कंपन्यांपैकी गेल, एचपी, आयपीसीएल, आरसीएफ अशा कंपन्यांही आहेत. त्यामुळे जिल्ह्याची लोकसंख्या वाढलेली आहे.आरोग्य व्यवस्थेवर त्याचा परिणाम होत असतानाच त्यामध्ये सुधारणा करणे हे अतिशय महत्त्वाचे असल्याचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी सुरुवातीलाच ओळखले होते. त्यानुसार त्यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सुविधा सुधारण्यावर भर दिला आहे.रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथे आहे. त्याच ठिकाणी जिल्हा सरकारी रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून उपचारासाठी रुग्ण येत असतात. त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये येथूनही पुढील उपचारासाठी रुग्ण येत असतात. या ठिकाणी येणारे रुग्ण अत्यवस्थ झाले, तर त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे न्यावे लागते. अलिबाग-मुंबई हे अंतर १२० किलोमीटर आहे. त्यामुळे किमान चार तासांचा अवधी लागतो.रुग्णासाठी तर, प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. त्यामुळे रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळण्यासाठी कमी अवधीमध्ये मुंबई येथे पोचणे गरजेचे आहे. त्यासाठी सागरी मार्गाच्या पर्यायाची संकल्पना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी मांडली. त्यानुसार जिल्हा सरकारी रुग्णालयाने त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला. तो सरकारला मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. शुक्रवारी याबाबतची बैठक पार पडली, त्यावर सकारात्मक चर्चा झाली. यासाठी विविध योजनेतील निधी, तसेच कंपन्यांच्या सीएसआरमधून निधी उभारण्यात येणार आहे.अलिबागवरून रुग्णांना मांडवा जेटीवरून ‘रुग्णवाहिका सागरी बोटीने’ गेटवे आॅफ इंडिया येथूून मुंबईतील रुग्णालयामध्ये सोडण्यात येणार आहे. मांडवा ते गेटवे आॅफ इंडिया हे सागरी अंतर २५ कि.मी. आहे. त्यासाठी एका तासाचा अवधी लागणार आहे. अलिबाग ते मांडवा २१ कि.मी.साठी पाऊण तास असे एकूण पावणे दोन तासांत मुंबईला पोहोेचता येणार आहे.अॅम्ब्युलन्स बोटचालक (तांडेल) पद संख्या तीन प्रतितांडेल २० हजार रुपये असा एक महिन्याचा खर्च ६० हजार रुपये, बोटीवर तीन खलाशी लागणार आहेत. त्यांना प्रतिखलाशी १५ हजार असा ४५ हजार रुपये खर्च होणार आहेत. दोन वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस असल्यास ५० हजार प्रतिमहिना, बीएचएमएस असल्यास ३० हजार रुपये प्रतिमहिना, दोन मदतनिसांसाठी प्रतिमहिना २० हजार रुपये खर्च होणार आहेत.अत्याधुनिक सुविधांनी युक्त असणाºया या अॅम्ब्युलन्स बोटीमध्ये मेडिकल रूम, मेडिकल स्टोर, आॅक्सिजन सिलिंडर, पिण्याचे पाणी, जनरल स्टोर, वॉश रुम, टॉयलेटची सुविधा राहणार आहे. त्याचप्रमाणे ही बोट संपूर्ण वातानुकूलित राहणार आहे. किमान सात व्यक्तींची सोय आहे. त्याचप्रमाणे या बोटीवर जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइसही बसवण्यात येणार आहे. तसेच जनरेटची सुविधाही देण्यात येणार आहे.बोट १२ नॉटिकल माईलने पाण्यातून जाणार असल्याने मांडवा ते गेटवे आॅफ इंडिया हे २५ किमीचे अंतर अवघ्या एक तासात पूर्ण करणार आहे. दक्षिण भारतात अशी बोट अॅम्ब्युलन्स सेवा सुरू आहे. आता रायगड जिल्ह्यात सुरू होणार आहे.सरकारी रुग्णालयातून मुंबई येथे अधिक उपचारासाठी दिवसाला किमान चार अत्यवस्थ रुग्ण पाठवले जातात. २०१२-१३ या कालावधीत ११७६ रुग्ण मुंबईतील रुग्णालयात नेले होते. २०१३-१४ या कालावधीत १२२४, २०१४-१५ मध्ये १२६२, २०१५-१६ या कालावधीत १४१७ आणि २०१६-१७, १२४३ असे एकूण ६३२२ रुग्णांचा समावेश होता.
अत्यवस्थ रुग्णांना मिळणार नवसंजीवनी , रुग्णवाहिका सागरी बोटींचा प्रस्ताव तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 2:54 AM