चिंभावे धनगरवाडीकडे शासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:14 AM2018-04-24T01:14:59+5:302018-04-24T01:14:59+5:30
चिंभावे धनगरवाडीच्या ग्रामस्थांना आजदेखील भर उन्हात पायपीट करावी लागत आहे.
सिकंदर अनवारे ।
दासगाव : महाड तालुक्यातील विविध गावांचा विकास झाल्याच्या गप्पा लोकप्रतिनिधींकडून केल्या जात असल्या तरी आजदेखील अनेक वाड्या रस्त्यापासून वंचित आहेत, याचे चिंभावे धनगरवाडी हे एक उदाहरण आहे. या परिसरात धनगरवाडी आहे, हेदेखील अनेकांना माहीत नाही. यातूनच ही धनगरवाडी किती दुर्लक्षित राहिली आहे हे दिसून येते. चिंभावे धनगरवाडीच्या ग्रामस्थांना आजदेखील भर उन्हात पायपीट करावी लागत आहे.
महाड तालुक्यातील खाडीपट्टा हा तसा पाहिला तर सधन विभाग मानला जातो. सावित्री खाडीतील वाळू व्यवसाय तसेच मासेमारी यामुळे या परिसरात रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. यामुळे अनेक गावे आणि वाड्यांवर विकास झाला आहे. मात्र, या विकासापासून चिंभावे धनगरवाडी दूरच राहिली आहे. चिंभावे धनगरवाडी या परिसरात आहे हेदेखील अनेकांना माहीत नाही. चिंभावे गावापासून उंच डोंगरावर ही वाडी वसली आहे. वाडीवर जवळपास २५ जे ३० घरे आहेत तर १००च्या आसपास लोकसंख्या आहे. या वाडीवर जाण्याकरिता पायी चालत जावे लागते. डोंगरातून वाट काढत उन्हातान्हात आजदेखील या धनगरवाडीवासीयांची पायपीट सुरूच आहे. गेली अनेक वर्षे या वाडीवर रस्ता व्हावा, म्हणून मागणी आहे. मात्र, त्यांचे रस्त्याचे स्वप्न अपूर्णच आहे.
वाडीतील काही तरुणच शहरात नोकरीकरिता गेलेत. बाकीचे तरुण शेतीकडे वळले आहेत. वाडीवरील बहुतांश शेतकरी हे भूमिहीन आहेत. यामुळे ते चिंभावे गावातील लोकांची शेती करतात. ते शेतकरी शासनाच्या योजनेपासून वंचित आहेत.
जगण्याची हरवलेली वाट
१रस्ता नसल्याने गावात घर बांधायचे झाले तरी सर्व सामान डोक्यावर घेऊनच गावात जावे लागते. याकरिता अधिक वेळ आणि श्रम वाया जात आहेत. रस्ता नसल्याने वाडीचा विकास देखील ठप्पच आहे. चिंभावे ग्रामपंचायतीमध्ये या वाडीचा समावेश होत आहे. चिंभावे गावात विकास झाला असला, तरी या वाडीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. चिंभावे गावापासून किमान दोन किमीची पायपीट करत जावे लागत असल्याने कोणीही शासकीय अधिकारी तसेच कर्मचारी आजतागायत इकडे फिरकला नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
चिंभावे धनगरवाडीवर शेतीबरोबरच दुग्ध उत्पादन आहे. मात्र, चिंभावे गाव जवळपास दोन किमी डोंगर उतरून खाली तर मंडणगड देखील अर्धा तासावर यामुळे जेवढे दुध उत्पादन या ठिकाणी होते, तेवढे दूध फक्त मुलांना आणि दही सारखे पदार्थ बनवण्याकरिता उपयोगात येते. रस्ता नसल्याने या दुधाला बाजार उपलब्ध होत नाही, यामुळे दुग्ध उत्पादनातून आर्थिक नफा मात्र येथील लोकांना मिळत नसल्याचे नामदेव ढेबे यांनी सांगितले.
वाडीवर नेहमीचीच पाणीबाणी
चिंभावे गावापासून उंच डोंगरावर ही वाडी वसली असल्याच्या कारणाने या वाडीवर नळपाणीपुरवठा करणे शक्य झालेले नाही. वाडीवर एक विहीर आहे. मात्र, या विहिरीतील पाणी देखील कमी होत आले आहे. वाडीपासून देखील ही विहीर कांही अंतरावर लांब आहे यामुळे डोक्यावरूनच येथील महिलांना पाणी भरावे लागत आहे असे लक्ष्मी आखाडे यांनी सांगितले.
शिक्षणासाठी मुलांची अर्धा तासाची पायपीट
२गावात अंगणवाडी आहे मात्र ती देखील नावालाच. अंगणवाडी सेविका ही चिंभावे गावात राहत असून, या गावातून पायी चालत जावे लागत असल्याने कधी तरी अंगणवाडीत येते, अशी तक्र ारदेखील येथील नागरिकांनी केली. या वाडीतील काही मुले शिक्षणाकरिता चिंभावे गावात येतात. त्यांनादेखील पायपीटच करावी लागते. ऐन पावसाळ्यात मात्र या मुलांना शाळेला मुकावे लागते. वाटेत अनेक ठिकाणी पाण्याचे मोठे नाले आणि दाट जंगल यामुळे एकट्या-दुकट्या मुलांना पाठवण्यास पालकदेखील तयार होत नाहीत. काही मुले या वाडीपासून मंडणगड तालुक्यातील वाकवली येथे शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. या मुलांना अर्धा तास चालत कादवणला जावे लागते, त्यानंतर कादवन येथून वाकवणकरिता एसटी बस मिळते, असे इयत्ता नववीतील विद्यार्थी मंगेश आखाडे याने सांगितले.
माजी मंत्री प्रभाकर मोरे यांच्या काळात या ठिकाणी एक वेगळी यंत्रणा वापरून विजेची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे. मात्र, आता जिल्हा नियोजनमधून रस्त्याच्या कामाकरिता १२ लाखांच्या निधीची मागणी केली आहे. मंजूर होताच रस्त्याचे काम केले जाईल. रस्ता होणे या वाडीच्या विकासाकरिता महत्त्वाचे आहे
- जयवंत दळवी,
भाजपा तालुकाध्यक्ष
गावात रस्ता व्हावा म्हणून आम्ही अनेक वेळा मागणी केली आहे. मात्र, आमच्या रस्त्याचे स्वप्न काही केल्या पूर्ण होत नाही. रस्ता नसल्याने आमच्या बरोबरच आमच्या मुलांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे ना दूध विक्र ी होते ना कोणताच विकास होतो.
- दिनेश ढेबे, ग्रामस्थ