अलिबाग : अलिबाग वडखळ हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे. या राष्ट्रीय मार्गावर राऊत वाडी येथील दोनशे मीटर रस्त्यावर तसेच इतर ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. मात्र हे खड्डे बुजविण्यास विभागाकडे वेळ नसल्याने अखेर वाडगाव मधील काही ग्रामस्थांनी एकत्र येऊन बुरूम टाकून खड्डे भरले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात वाहन चालकांना दिलासा मिळालेला आहे. तर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या दुर्लक्ष पणाचा फटका हा वाहन चालकांना भोगावा लागत आहे.
अलिबाग हे पर्यटन स्थळ असल्याने हजारो पर्यटकांची तसेच इतर वाहनाची वर्दळ नेहमीच अलिबाग वडखळ महामार्गावर चालू असते. याच रस्त्यावर अलिबाग ते कार्लेखिंड दरम्यान मोठ मोठे खड्डे पडले आहेत. राऊत वाडी येथे दोनशे मीटर रस्ता हा पूर्णतः खड्डेमय झाला आहे. या खड्यामध्ये वाहने आपटून अपघाताच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. खड्डे भरण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाला सांगूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
अखेर वाडगाव ग्रामस्थ यांनी खड्डे भरण्यास पुढाकार घेतला. बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी वाडगाव ग्रामस्थ यांनी खड्डे साफ करून त्यावर बूरुम टाकून तात्पुरते खड्डे भरले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात वाहन चालक आणि प्रवाशांना खड्यापासून मुक्ती मिळाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग याची खड्डे भरण्याची जबाबदारी असताना त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. होणाऱ्या अपघाताची जबाबदारीही या विभागाची आहे. मात्र नागरिकांच्या सुरक्षेबाबत विभागाचा हलगर्जीपणा दिसत आहे.