अलिबाग : जगभरात डायमंड किंग म्हणून ओळख असणा-या आणि पंजाब नॅशनल बँकेला तब्बल ११ हजार ३०० कोटी रुपयांचा गंडा घालणा-या नीरव मोदीच्या देश-विदेशातील कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता सील केल्या जात आहेत. सीबीआय आणि सक्त वसुली संचलनालयाने ही कारवाई सुरू केली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील किहीम येथील कोट्यवधी किमतीचा आलिशान बंगला तपास यंत्रणेच्या अद्याप नजरेत आलेला नसला, तरी लवकरच त्यालाही सील ठोकले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अलिबाग तालुक्यामध्ये बडे-बडे उद्योगपती, सिनेकलावंत यांच्यासह हाय प्रोफाइल व्यक्तींच्या टोलेजंग इमारती, आलिशान बंगले उभे आहेत. विशेष करून या सर्व मालमत्ता या समुद्रकिनाºयाला लागूनच आहेत. नीरव मोदी यालाही अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनाºयांची भुरळ पडली. त्यानेही अलिबाग-किहीम येथे मालमत्ता विकत घेतली. पूर्वी ही मालमत्ता एका राजकीय नेत्याची होती, असे बोलले जात आहे. ही मालमत्ता सामायिकरीत्या विकत घेतली आहे. ६३.११ गुंठे हिस्सा हा नीरव मोदीच्या नावे, तर ७.११ गुंठे हिस्सा हा सिराज मोहमद भोलुभाय याचा आहे. नीरव मोदी याने या ठिकाणी आलिशान बंगला बांधला आहे. त्या वास्तूमध्ये लाखो रुपये किमतीच्या वस्तू असल्याचे स्थानिक सांगतात. त्यामुळे या वास्तूची किंमत सुमारे चार कोटींच्या घरात आहे.सीबीआय आणि सक्त वसुली संचालनालयाने देश-विदेशात छापेमारी करून नीरव मोदीच्या तब्बल पाच हजार १०० कोटी रुपयांच्या मालमत्तांना टाळे ठोकले आहे. मोदीच्या अन्यही मालमत्ता हुडकून त्या सील करण्याची कारवाई सुुरू असल्याने अलिबाग-किहीम येथील मालमत्ताही तपास यंत्रणेकडून सील केली जाण्याची शक्यता आहे.अलिबाग तालुक्यातील किहीम येथे नीरव मोदी यांची सामायिक मालमत्ता आहे. अन्य कोठे मालमत्ता आहे का? याची माहिती घेतली जात आहे.- प्रकाश सकपाळ,तहसीलदार, अलिबाग
अलिबागमध्येही नीरव मोदीची मालमत्ता, सील ठोकण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 3:03 AM