नेरळ : नेरळ बस स्थानकात दरवर्षी पावसाचे पाणी अडून बस स्थानकाला तलावाचे स्वरूप येते. त्यामुळे हजारो प्रवाशांना पाण्यातून व चिखलातून प्रवास करावा लागतो. यासंदर्भात ‘नेरळ बस स्थानकात गैरसोय’ असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या बातमीची दखल घेत कोल्हारे ग्रामपंचायतीने बस स्थानकात खडीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय आता दूर होणार आहे.एसटी परिवहन महामंडळाच्या कर्जत आगाराअंतर्गत हे नेरळ बस स्थानक येते. येथून दररोज अनेक बस फेऱ्या नेरळ परिसरातील गावांमध्ये होत असतात. हजारो प्रवासी या बस स्थानकातून ये -जा करतात. परंतु बस गाड्यांपेक्षा खासगी गाड्यांचाच गराडा येथे पहायला मिळतो. नेरळला रेल्वे स्थानक असल्याने ग्रामीण भागातून हजारो प्रवासी रेल्वे पकडण्यासाठी याच बस स्थानकातून ये -जा करतात. परंतु पावसामुळे या बस स्थानकात गुडघाभर पाण्यातून प्रवाशांना जावे लागते. हळूहळू पाणी कमी झाल्याने येथे चिखल जमा होऊन दुर्गंधी पसरते. परंतु तशाच अवस्थेत प्रवासी येथून जात असतात. आगारप्रमुख डी. एस. देशमुख यांनी आम्ही कर्जत पंचायत समिती, कर्जत तहसीलदार याकडे पत्रव्यवहार केल्याचे सांगितले होते. परंतु संबंधित अधिकारी दखल घेत नसल्याचे सांगितले होते. परंतु नेरळ बस स्थानकाची अवस्था पाहून कोल्हारे ग्रामपंचायतीने अखेर दखल घेतली आहे. काही दिवसांपूर्वी खडी आणि रेती बस स्थानकात टाकण्यात आली होती. परंतु मजूर मिळत नसल्याने हे काम थांबले होते. मात्र गुरु वारी बस स्थानकात खड्ड्यांमध्ये व पाणी जमा होत असलेल्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खडी व त्यावर रेती टाकण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे पाऊस पडला तरीही बस स्थानकात पाणी व चिखल जमा होणार नाही. या कामामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्तके ले आहे.(वार्ताहर)
नेरळ बसस्थानक होणार खड्डेमुक्त
By admin | Published: July 29, 2016 2:47 AM