नेरळ धरण झाले गाळमुक्त, शेकडो ट्रक माती,दगड काढले बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 01:41 AM2019-06-13T01:41:27+5:302019-06-13T01:41:58+5:30
ब्रिटिशकालीन बांधकाम : शेकडो ट्रक माती,दगड काढले बाहेर
नेरळ : नेरळ ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या ब्रिटिशकालीन धरणातून तब्बल दहा वर्षांनंतर गाळ काढण्यात येत आहे. आतापर्यंत किमान ९०० ट्रक मातीचा गाळ बाहेर काढण्यात आला. मोठ्या प्रमाणात दगड देखील बाहेर काढले असून धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे, तर दुसरीकडे धरणातील गाळ काढताना त्या परिसरात तब्बल दोन ठिकाणी उद्यान विकसित करण्यास जागा उपलब्ध झाली आहे.
नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकीचे असलेले ब्रिटिशकालीन धरण हे गेल्या काही वर्षात स्वच्छ केले नसल्याने मातीने भरले होते. या वर्षी अनेक स्थानिकांनी मागणी केल्यानंतर नेरळ ग्रामपंचायतीने निधीची तरतूद करून मे महिन्यात धरणातील शिल्लक असलेले पाणी सोडून दिले होते. त्यानंतर गेली १५ दिवस धरणातील गाळ काढण्याचे काम नेरळ ग्रामपंचायतीकडून सुरू आहे. धरणात माथेरान डोंगरातून वाहून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने दरवर्षी पाण्याबरोबर दगड आणि माती वाहून येत असते. त्यामुळे धरणातील किमान तीन एकरचा परिसर दगड आणि मातीने व्यापला होता. त्यामुळे धरणाचा जलाशय उरलेल्या ठिकाणी माती आणि दगड काढून काही फायदा नाही तर धरणातील पाणीसाठा वाढावा असा प्रयत्न उपसरपंच अंकुश शेळके यांनी सुरू केला. आधी पाणी सोडून दिल्यानंतर धरणाच्या तिन्ही बाजूला जेसीबी मशिनच्या साह्याने जलसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि आज त्या ठिकाणी मोहचीवाडी बाजूला एक मोठे मैदान निर्माण झाले आहे. तर धरणातील पाणी सोडल्यानंतर ज्याला हवी आहे त्याला गाळयुक्त माती नेण्याचे धोरण सरपंच जान्हवी साळुंखे यांनी जाहीर केल्याने अनेकांनी आपल्या शेतीसाठी खत होऊ शकेल अशी माती नेण्यास भर दिला. त्यामुळे धरणाच्या मुख्य जलाशयातील माती अधिक लवकर काढली गेली. तब्बल दोन पायऱ्या म्हणजे किमान १५ फूट जे मातीत अनेक वर्षे गाडून गेले होते,ते पुन्हा बाहेर येण्यात उपयोग झाला आहे. धरणातील पाणीसाठा वाढावा हा हेतू ग्रामपंचायतीने ठेवलेला नाही तर ब्रिटिशकालीन धरण अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या ठिकाणी असलेला बंधाºयाला असलेली गळती रोखण्यासाठी बांधकाम केले जात आहेत. तत्कालीन सरपंच भगवान चंचे यांनी त्या भागात निर्माण केलेले पर्यटन केंद्र यांची डागडुजी देखील नेरळ ग्रामपंचायत सध्या करीत आहे. तर धरणाच्या खाली नव्याने मातीचा भराव करून त्या ठिकाणी एक बगिचा या पावसाळ्यात फुलविला जाणार आहे, अशी माहिती सरपंच जान्हवी साळुंखे यांनी दिली.