नेरळ ग्रामपंचायतीचे ५६ लाखांचे वीजबिल थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:20 PM2020-02-25T23:20:26+5:302020-02-25T23:20:32+5:30
वीजजोडणी तोडणार; गतवर्षापासूनचे बिल थकीत; पाणीपुरवठाही होणार बंद
- कांता हाबळे
नेरळ : जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम समजल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीची महावितरणच्या वीजबिलापोटी तब्बल ५६ लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी नेरळ ग्रामपंचायतीची वीजजोडणी तोडली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीला होणारा पाणीपुरवठा आणि गावातील पथदिवे यांची वीज कापली जाण्याची शक्यता आहे.
नेरळ ग्रामपंचायतीचे वीजबिल तब्बल ५६ लाखांवर पोहोचले आहे. महिन्याला साधारण सहा लाखांचे वीजबिल नेरळ ग्रामपंचायतीला आकारण्यात येते. त्यात सार्वजनिक वीज ही पथदिवे आणि नळपाणी योजनेसाठी येणारे वीजबिल हे साधारण सहा लाखांवर जाते. फेब्रुवारी २०१९ पासून वीजबिल थकीत आहे. ग्रामपंचायतीचे मागील सदस्य मंडळ आणि डिसेंबर २०१९ मध्ये सत्तेवर आलेले सदस्य मंडळ अशा दोघांच्या कार्यकाळात झालेली वीजबिल थकबाकी आहे. त्यात नवीन सदस्य मंडळांच्या काळातील दोन महिन्यांचे १२ लाखांचे वीजबिल थकीत आहे.
थकबाकी भरली जावी, यासाठी महावितरण कंपनीकडून सातत्याने नेरळ ग्रामपंचायतीकडे तगादा लावला जात आहे; परंतु ग्रामपंचायतीकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीची वीजजोडणी तोडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास नेरळ ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना बंद होऊ शकते, त्याच वेळी पथदिव्यांना होणारा वीजपुरवठा खंडित झाल्यास रस्तेही अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, जिल्ह्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून ओळख असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीतील नागरिकांवर वीज, पाणी आदी मूलभूत गरजांपासून वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही.
फेब्रुवारीपासून २०१९ पासून नेरळ ग्रामपंचायतीची वीजबिले थकीत आहेत. महावितरणने या प्रकरणी अनेकदा नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने महावितरण ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या विचारात आहे.